कोपरगाव मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था दयनीय – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून, प्रवाशांसह शेतकरी व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. यात प्रजिमा ०४ रवंदे-धामोरी-रामा ०७ व प्रजिमा ०५ टाकळी-रवंदे या मार्गांवरील मोठमोठे खड्डे नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत त्याची तातडीने दुरुस्ती करावी असे पत्र कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी प्रशासनाला दिले आहे.

या रस्त्याने दररोज हजारो शेतकरी आपल्या शेतमालासह प्रवास करतात. दुध उत्पादकांना वेळेत दूध संकलन केंद्रावर पोहोचण्यासाठी या मार्गाचा उपयोग करावा लागतो. महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांची देखील मोठ्या प्रमाणात ये-जा या रस्त्यावरून होत असते. मात्र, रस्त्यावर सर्वत्र पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे प्रवाशांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा दुचाकीस्वार घसरून जखमी झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या पार्श्वभूमीवर, युवानेते विवेक कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, संगमनेर यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे की, या रस्त्यांचे खड्डे त्वरित बुजवून दुरुस्तीचे काम सुरू करावे. पावसाळ्याच्या दिवसांत खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे प्राण धोक्यात येत आहेत. त्यामुळे तात्काळ लक्ष देऊन आवश्यक ती पावले उचलणे ही काळाची गरज आहे.

विकास कामांच्या माध्यमातून ग्रामीण जनतेचा विश्वास जपण्याचे काम नेहमीच होत असते. त्याचाच एक भाग म्हणून रस्त्यांची दुरुस्ती झाल्यास शेतकरी, विद्यार्थी, दुध उत्पादक व सर्वसामान्य नागरिक यांना दिलासा मिळेल.

शेतकऱ्यांचे उत्पादन वेळेत बाजारात पोहोचणे, विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास होणे, तसेच अपघातांच्या घटना टाळणे या दृष्टीने या रस्त्यांची दुरुस्ती अत्यंत आवश्यक असल्याचे विवेकभैय्या कोल्हे यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, “जनतेचा प्रश्न हीच आमची प्राथमिकता आहे आणि नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा कोल्हे यांनी दिला आहे.

Leave a Reply