कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव शहरातील सर्वांगीण विकासासाठी आणखी एक महत्वाचा टप्पा गाठण्यात यश मिळाले आहे. कोपरगाव शहरातील विविध विकास कामांसाठी एकूण ४ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीला शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आ.आशुतोष काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. या पाठपुराव्यातून पुन्हा एकदा कोपरगाव शहरातील विविध विकासकामांसाठी शासनाकडून प्रशासकीयमान्यता मिळाल्यामुळे नागरीकांच्या अडचणी दूर होणार आहेत. या निधीतून शहरातील अनेक महत्त्वाची कामे हाती घेतली जाणार असून रस्ते मजबुतीकरण, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण, शाळा खोल्या बांधणे, सभागृह बांधणे आदी कामांचा समावेश आहे.

यामध्ये कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ०९ मध्ये सभागृह बांधणे ४० लाख, हद्दवाढ भागातील दिक्षित वस्ती कडे जाणारा रस्ता करणे १९.९८ लाख, हद्दवाढ भागातील देवकर प्लॉट रस्ता करणे १९.९७ लाख, हद्दवाढ भागातील साईलक्ष्मी नगर रस्ता करणे ४९.९६ लाख, साईबाबा कॉर्नर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक रस्ता करणे व सुशोभीकरण करणे ५९.९८ लाख, नगरपरिषद हद्दीतील खडकी मदरसा येथे अभ्यासिका बांधणे २९.९८ लाख, प्रभाग क्रमांक ०१ मध्ये रस्ते करणे ५९.९८ लाख,

प्रभाग क्रमांक ०४ मध्ये रस्ते करणे ५९.९८ लाख, लायन्स मूकबधिर विद्यालय कोपरगाव येथे शाळा खोल्या बांधणे २९.९५ लाख, नगरपरिषद येथील नगरपालिका शाळा क्रमांक पाच येथे शाळा खोल्या बांधणे १९.९९ लाख, प्रभाग क्रमांक ०२ मध्ये वॉल कंपाऊंड व सभागृह बांधकाम करणे १९.९८ लाख, तसेच प्रभाग क्रमांक दोन मध्ये साईसिटी ते काका कोयटे घर रस्ता करणे ४९.९८ लाख अशा एकूण ०४.६० कोटीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

मागील काही वर्षांपासून कोपरगाव शहराचा वेगाने विकास होत असला तरी अजूनही काही भागांत मूलभूत सोयीसुविधांची गरज जाणवते. नागरिकांच्या अडचणी व मागण्या लक्षात घेऊन शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे या कामांना अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कोपरगाव शहर आपल्या जिल्ह्यातील एक गतिमान, वाढते शहर आहे.

शहराचा संतुलित विकास, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरी सोयी यासाठी सातत्याने काम करणे ही माझी बांधिलकी आहे. शासनाच्या विविध योजनांमधून आणखी निधी मिळवून कोपरगावचा दर्जा उंचावण्यासाठी माझे प्रयत्न यापुढेही सुरु राहणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.


