रस्ते झाडणाऱ्या आईची लेक व बुटपाॅलीस करणाऱ्या भावाची बहीण झाली अधिकारी
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : एकेकाळी कोणीही घरी येत नव्हते, घरात अठरा विश्व दारिद्र्य, वडिलांचे छञ हरवलेलं, वृध्द आई रस्ते झाडून कुंटूंबाला अधारदेत होती. चार बहीणी, एक भाऊ या सर्वांची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका भावाने आपल्या छोट्या बहीणीला अधिकारी बनवण्यासाठी स्वत:ला झोकुन बुटपाॅलीस करुन बहीणीच्या शिक्षणाला पुरेपूर मदत करीत होता. अखेर भावाच्या व आईच्या मेहनतीला चार चाॅंद लावून जिद्द , चिकाटी व अपार मेहनतीच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत कोपरगावची कन्या पोलीस उपाधिक्षक पदाला गवसणी घातली आणि कधीही कोणी साधी गुलाबाची पाकळी दिली नव्हती.

माञ ती अधिकारी होताच फुलांचा वर्षाव सुरु झाला. हारतुरे, बुक्याने अनेक पोते भरली हि कहाणी आहे शहरातील सुभाषनगर येथील उषा गंगाधर पवार या यशस्वी कन्येची. तीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ५०८ वी रॅंक मिळवून राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गातून १५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत पोलीस उपअधीक्षकपदी विराजमान होण्याचा विक्रम कोपरगाव तालुक्यात केला आहे. हे यश संपादन करुन अधिकारी होणारी तालुक्यातील पहीलीच कन्यारत्न आहे.

घराची परिस्थिती हालाखीची असल्याने बालपणापासून अनेक गोष्टींचा संघर्ष वाट्याला आलेली उषा पवार हीला उच्च दर्जाचे शिक्षण घेता आले नसल्याने कोपरगाव नगरपालीकेच्या शाळेत कसेबसे प्राथमिक शिक्षण घेतले, येथील शासकीय विद्यालयातून पुढील शिक्षण पुर्ण करीत महाविद्यालयीन शिक्षण कला शाखेतून पुर्ण करुन एम ए ही पदवी संपादन केली. घरच्यांच्या पाठींब्यावर उषा पवार हीने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.

भाऊ ज्ञानेश्वर गंगाधर पवार याने स्वतःचे लग्न करता बहीणीला अधिकारी बनवण्यासाठी बुटपाॅलसचे काम करुन हवी ती मदत करीत होता. तर आई अहिल्याबाई गंगाधर पवार ह्या कोपरगाव नगरपालीकेच्या स्वच्छता विभागात ठेकेदारीवर रस्ते झाडण्याचे काम करून शहरातील रस्ते स्वच्छ करता करता आपल्या लेकीच्या आयुष्यातील खडतर मार्ग स्वच्छ करण्याचं ठरवलं होतं.

आई व भावाच्या कष्टाचं सोनं करण्याची धडपड उषा पवार हीच्या मनी असल्यामुळे काही ही झालं तरी मी अधिकारी होणारच अशी खुणगाठ मनात बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. त्यासाठी उषा पवार हीच्या बहीणींनी मोलाची साथ दिल्याने पाठबळ वाढले आणि उषाने मागचा पुढचा विचार न करता अभ्यासात सातत्य ठेवले. दहावीला केवळ ४५ टक्के गुण होते तर बारावीला ६० टक्के गुण असुनही अभ्यासात सातत्य ठेवत १६ वेळा स्पर्धा परीक्षेतील मुख्य परीक्षेत अपयश पचवले. अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या तिथेही यश आले नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करीत शेवटी जिद्दीने थेट पोलीस उपाधिक्षक होण्याचा विक्रम उषा पवार ने बोलताना दिली.

उषा बोलताना म्हणाली की, जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या घरच्या परिस्थितीमुळे व्याकुळ व्हायचं नाही. जर आपल्या घरच्यांचा पाठिंबा आपल्याला भक्कम असेल तर इतरांचा कसलाही विचार न करता भौतिक सुखापासुन दूर होवून, जिद्द, चिकाटी व सातत्य या तीन गोष्टींची शिस्त स्वत:ला लावले पाहीजे. आपण कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतलो हे महत्वाचे नसुन आपण लोक आयोगाचा कसा अभ्यास करतो व त्याचा रॅंक कसा मिळवतो यावर सर्व काही आहे तिथे तुमची अर्थीक परिस्थिती विचारली जात नाही. तिथे तुमचा स्कोर पाहीला जातो. म्हणून जास्त टक्केवारी असलेले मुलं खुप हुशार असतात असे काही नाही.
३० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल लागला त्यात उषा पवार ही कोपरगावची पहीली पोलीस उपाधिक्षक झाल्याची माहीती समजताच कोपरगावचा कोपरानं कोपरा उजळला. अनेकांना उषा पवारांचं घर माहीत नव्हते आता तीच्या घराकडे सत्कारासाठी विविध क्षेञातील मान्यवरांच्या रांगा लागल्या.

३५ टक्के गुणाने पास झालेला ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवून अधिकारी होवू शकतो. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अभ्यासातील सातत्य व आपली जिद्द म्हत्वाची आहे. स्वप्नपुर्तीची केवळ चर्चा करु नका. स्वत:ला नियम लावा, एकाग्रतेने योग्य अभ्यासक्रमाचा अभ्यास करा यश हमखास आहे. झोपडपट्टीतील मुलामुलींनी आपल्या वलयातून बाहेर पडा. मनातलं दडपण झुगारुन ध्येयवेडे व्हा आपली परिस्थिती आपण बदलु शकतो. आमच्या अनेक पिढ्यांमध्ये कोणीही अधिकारी नाही किंवा उच्चशिक्षित नाहीत मीच आमच्या पिढीतली पहीली अधिकारी झाले असेही उषा पवारने अभिमानाने सांगत माझ्या निवडीबद्दल तसेच यशाबद्दल आपल्यावर सर्वांनी भरभरुन अभिनंदनाचा वर्षाव केल्याबद्दल ऋण व्यक्त करून आभारही मानले.
आपल्या मुलीच्या संघर्ष काळात बळ देताना आई अहील्याबाई पवार म्हणाल्या होत्या पोरी घाबरु नको उकिरड्याचा पांग फिटतो अर्थात कचऱ्याची जागा बदलते तू तर माणुस आहेस घाबरु नको लढत रहा यश नक्कीच येईल आणि हेच बोल खरे ठरले. उषा पवार आज अधिकारी झाली. आपल्या झोपडीतला अंधार दूर केला.


