कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : सोमवारपासून नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होत आहे. कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदान केंद्र व विविध पथक यासाठी ७५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असून अर्ज दाखल करतांना केवळ ३ व्यक्तिंना प्रवेश दिला जाणार असल्याची महीती उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र.७ अहिल्यानगर श्रीमती भारती सागरे तथा निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार कोपरगाव महेश सावंत,(१), सहाय्यक निवडणूक अधिकारी(२), मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली.

२ डिसेंबरला२०२५ रोजी कोपरगाव नगरपरिषदेसाठी मतदान होत असून सोमवार दिनांक १० नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरवात होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ११ प्रकारची कागदपत्रे जोडावी लागणार आहे. त्यात शपथपत्र, मतदारयादीतील क्रमांकाची प्रत, पासबुक छायाप्रत, अनामत रक्कम पावती, घोषणापत्र, अपत्याबाबतचे पार्श्वभूमी नसल्याबाबतची स्वयंघोषणापत्र गुन्हेगारी नोटरी, राखीव मतदारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र, दैनिक खर्च व एकूण निवडणूक खर्च हमीपत्र, नगरपरिषदेकडील थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र विहित नमुन्यात जमा करावे लागणार असल्याचेही सांगितले.

त्याच प्रमाणे नाम निर्देशन पत्र दाखल करतांना प्रतिनिधी व सूचक यांनाच प्रवेश दिला जाणार असून मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवाराला एक सूचक लागणार आहे. तर अमान्यताप्राप्त पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवाराला ५ सूचक लागणार आहेत. ज्या प्रभागातून अर्ज दाखल होणार आहे त्याच प्रभागातील सूचक असावा लागणार आहे. सुचकाने एकापेक्षा उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी केल्यास प्रथम प्राप्त उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्जावर वेगवेगळे सूचक लागणार आहेत.

कोपरगाव शहरातील एकूण ६९ मतदान केंद्रांसाठी ५ क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. नामनिर्देशन अर्जासोबत लागणाऱ्या प्रमाणपत्रे, कागदपत्रांच्या पडताळणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली.

सोबत जोडलेल्या निवडणूक कार्यक्रमा प्रमाणे कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. नामनिर्देशन पत्र १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतच स्वीकारले जातील अशी माहीती देण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


