मनसेचे संतोष गंगवाल यांचा भाजपा प्रवेश
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : मनसेचे उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल व दिव्यांग सेलचे जिल्हाअध्यक्ष योगेश गंगवाल यांच्यासह समर्थकांनी युवानेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. नगरपरिषद निवडणूक जसजशी रंगात येत आहे तसाच प्रचाराचा धडाका धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हे कुटुंबाचे सामाजिक आणि राजकीय योगदान विचारात घेऊन गंगवाल यांनी देशात राज्यात भाजपा आहे, त्यामुळे आता शहरातही कमळ फुलवण्याचा विजयी निर्धार व्यक्त केला आहे.

भाजपाचे सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही विजयाची नांदी ठरणार आहे. निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी संतोष गंगवाल यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी विवेक कोल्हे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. शहरात नागरिकांना समस्यांपासून सुटका पाहिजे आहे. भाजपाचे बळ यामुळे वाढले आहे. सामाजिक काम पुढे घेऊन जाण्याचे काम गंगवाल यांनी केले आहे. अनेक आंदोलने,संघर्ष करणारा तत्वनिष्ठ कार्यकर्ता म्हणून गंगवाल यांची ओळख आहे त्यामुळे नक्की या निवडणुकीत अधिक ऊर्जा येईल असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.

संतोष गंगवाल म्हणाले, मी मनसेचा कालच राजीनामा दिला आहे. भाजपा मला सर्वाधिक प्रगतीचा विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे. व्यापारी महासंघाच्या माध्यमातून मीही पदाधिकारी होतो पण दुर्दैवाने तिथे काम न करू देता नावाला पदे दिलेली होती. ठराविक पाच-सात लोक म्हणजे सर्व व्यापारी आहेत की, काय असा अपप्रचार अनेकदा झाला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी करा असे काका कोयटे यांना सांगितले होते.

मात्र त्यावेळी त्यांनी मी राजकारण करणार नाही राजकारण सोडले आहे अशी भाषा वापरली. आता मात्र अचानक अशी काय उपपत्ती झाली त्यामुळे त्यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला हे न ऊलगडणारे कोडे आहे. आम्ही सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी मैदानात काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मी स्वतः प्रत्येकाला सांगणार आहे. भाजपा ही व्यापारी बांधवांचा खरा विचार करणारा पक्ष आहे त्यांच्या पाठीशी उभे राहू असे गंगवाल यांनी ठामपणे सांगितले आहे. प्रसंगी भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


