कोपरगाव प्रतिनिधी, १४ : शैक्षणिक गुणवत्ता, नियोजनबद्ध प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत द टाइम्स ऑफ इंडिया व द स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स – २०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती संदीप कोयटे यांना The Best Management in International School – Maharashtra हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

या पुरस्कारामुळे समता इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थापन पद्धतीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. स्वाती कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत गुणवत्तापूर्ण, मूल्याधारित आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती प्रभावीपणे राबवली जात आहे. या यशामागे संस्थेचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची दूरदृष्टीपूर्ण शैक्षणिक संकल्पना व सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या विचारांवर आधारित व्यवस्थापनामुळे शाळेने अल्पावधीतच महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावर आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचे नियोजन प्राचार्य समीर आत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जाते. शिक्षक वर्गाच्या समन्वयातून अभ्यासक्रमासोबतच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला जात आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे म्हणाल्या, “हा सन्मान माझा वैयक्तिक नसून समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचा आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा सर्वांगीण विकास घडवून त्यांना भविष्यासाठी सक्षम बनवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली असून पुढील काळातही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आम्ही कटिबद्ध राहू.”

या मानाच्या पुरस्कारामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून समता इंटरनॅशनल स्कूलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


