कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : बहु-राज्य सहकारी संस्था कायदा २००२ च्या कलम ८४ (४) अंतर्गत एकाच वेळी इफको आणि कृभको या केंद्र शासनाच्या संस्थेचे दुहेरी सदस्यत्वाच्या संचालकांच्या पदावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे इफको नामनिर्देशन पत्रात कृभको संस्थेचे सदस्यत्व असल्याची माहिती लपवून ठेवल्यामुळे ईफकोचे संचालक असलेले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांचे ईफकोचे संचालक पद धोक्यात आले असून त्यांना या पदाला मुकावे लागणार असल्याची माहिती लोकसेवा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे चेअरमन व चेअरमन व सहकार भारती महाराष्ट्रचे प्रदेश सचिव नकुल कडू यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इफकोच्या निवडणुकांतील प्रतिनिधींच्या नामनिर्देशन व पात्रते वर लोकसेवा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे नकुल कडू यांनी आक्षेप घेतला असून केंद्रीय निबंधक रवींद्र कुमार अग्रवाल (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड) यांचे विरुद्ध संचालक पदाबाबत वाद निर्माण केला आहे. यामध्ये विशेषतः शेतकरी सहकारी संघ लि., कोपरगाव या संस्थेच्या प्रतिनिधीच्या पात्रतेवर आक्षेप घेण्यात आला आहे.

इफको आणि कृभको या दोन्ही संस्थांमध्ये दुहेरी सदस्यत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात येवून दुहेरी सदस्यत्व असल्याची माहिती नामनिर्देशनपत्रात लपविली असल्याचे नकुल कडू यांनी म्हटले आहे. हि माहिती लपविणारे शेतकरी सहकारी संघ लि.,कोपरगावचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक झालेले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांचे संचालक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या वादावर तोडगा काढण्यासाठी निवृत्त आयएएस अधिकारी सहाय मीना यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या वादाची सुनावणी अधिनियम, १९९६ अंतर्गत केली जाणार आहे. मध्यस्थाची फी व अन्य खर्च याच कायद्याअंतर्गत ठरवले जातील. तसेच, अर्ज सादर करण्यात झालेल्या उशीराच्या माफीनाम्यावरही आयएएस अधिकारी सहाय मीना निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कलम ८५ (३) अंतर्गत कल्याण सहाय मीना यांची ही नियुक्ती सहा महिन्यांसाठी वैध राहणार असून, गरज असल्यास ही मुदत केंद्रीय निबंधक वाढवू शकतात. या वादामुळे इफकोच्या निवडणुकीतील प्रक्रियेवर आणि सहकारी संस्थांच्या प्रतिनिधीत्वाच्या पारदर्शकतेवर नव्याने निर्णय होण्याची शक्यता असून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांचे ईफकोचे संचालक पद जाणार असल्याचे लोकसेवा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे नकुल कडू यांनी सांगितले आहे.

नकुल कडू हे ईफकोच्या निवडणुकीत विवेक कोल्हे यांचे प्रतिस्पर्धी होते. त्या निवडणुकीत नकुल कडू यांचा विजय निश्चित असताना विवेक कोल्हे यांनी खोटी कागद पत्र रंगवून त्यांचा अर्ज रद्द ठरविला होता. आपला अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद करून विवेक कोल्हे स्वतः ईफको आणि कृभको या दोन केंद्र शासनाच्या संस्थेचे सदस्य आहेत. नियमानुसार या दोन संस्थेचे सदस्य असल्यास सदस्यपद रद्द करण्याची तरतूद आहे. नेमके याच गोष्टीवर बोट ठेवून नकुल कडू यांनी विवेक कोल्हे यांच्या सदस्य पदाबाबत वाद उपस्थित करून त्यांनी दुहेरी सदस्य असल्याची माहिती लपविली असल्याचे निदर्शनास आणून दिल्यामुळे विवेक कोल्हे यांचे ईफको संचालक पद जावू शकते. ज्या कोल्हेंनी कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत स्वतःचे उमेदवार सोडून सर्वच उमेदवारांवर आक्षेप घेतले होते. त्याच विवेक कोल्हेंनी स्वतःच्या ईफकोच्या संचालक पदाच्या उमेदवारी अर्जात खोटी माहिती दिल्याचे उघड झाल्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत चर्चांना उधाण आले आहे.


