कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : तालुक्यातील पुर्व भागात असलेल्या पढेगावला अनेक दिवसांपासून बिबट्या आढळून येत होता. त्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते.अनेक महिन्यांपासून गावात तळ ठोकून बसलेल्या बिबट्याने अनेक कुत्र्याची पिल्ले आणि कुत्री फस्त केली होती. अनेकांनी बिबट्या त्याची पिले प्रत्यक्ष बघितली यामुळे गावात दहशतीचे वातावरण होते. याबाबत ग्रामपंचायतीने वनविभागाशी संपर्क अण्णासाहेब शिंदे यांचे शेतात पिंजरा लावण्यात आला. मंगळवार दि. १५ सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली.

बिबट्याच्या दहशतीमुळे काढणीला आलेली खरीपाची पिके काढणीची लगबग असताना रात्री घरातुन बाहेर पडावे की नाही याची सर्वांना चिंता सतावत आहे. कारण तालुक्यात यापुर्वी येसगाव येथील महिला आणि टाकळी शिवारात लहान मुलीचा बळी घेतला असुन अनेकांवर बिबट्याचे हल्ले झाले आहे. बिबट्याच्या मादिला पकडण्यात यश आल्यामुळे नागरीकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असुन या पकडलेल्या मादीला राहुरी याठीकाणी हलवुन नंतर तारा अभयारण्यात सोडणार असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.


