घरांचे उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा, वातावरण आनंदमय
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : भाजपा मित्रपक्षांच्या उमेदवाराच्या प्रचार सभेसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कोपरगाव येथे आले होते. यावेळी त्यांनी मोठे निर्णय जाहीर करून मास्टर स्ट्रोक लगावून निवडणूक एकतर्फी करून टाकली आहे. शासनाचे मुख्यमंत्र्यांच्या नंतर दुसरे सर्वात महत्वाचे निर्णय घेणारे मंत्री असल्याने ते काय बोलतात याकडे लक्ष लागले होते. भाजपा मित्रपक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

यावेळी नामदार बावनकुळे यांनी कोपरगाव नगरपालिका क्षेत्रातील हनुमान नगर, दत्तनगर, महादेव नगर, गोराबा नगर, गजानन नगर, लिंबारा मैदान, गांधी नगर, इंडोर गेम हॉल, टिळक नगर, संजयनगर, सुभाषनगर एक व दोन, लक्ष्मीनगर, साईनगर, येवला रोड, खडकी, जिजामाता नगर, टाकळी नाका या सर्व भागांमध्ये मी स्वतः महसूल मंत्री म्हणून जबाबदारी घेतो. कोपरगावमध्ये ५५०० ते ६००० घरांना उतारे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेदरम्यान सांगितले.

राज्यातील सरकारने याआधी कधीही असा निर्णय घेतला नव्हता. तुकडेबंदी कायदा महाराष्ट्रातील ६० लाख घरांना, कोपरगावच्या सर्व वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना या कायद्याची मोठी अडचण होती. ५००, ८००, १००० स्क्वेअर फूट प्लॉट घेतले, पण तुकडेबंदी कायद्यामुळे रजिस्ट्रेशन होत नव्हतं, फक्त नोटरी होत होती.तुकडेबंदी कायद्यात अडकलेल्या सर्व घरांची रजिस्ट्री लावून देण्याचं काम मार्गी लावू. वर्ग दोनच्या अटी हटवा तुमच्या जेवढ्या वर्ग एक व वर्ग दोन जमिनी आहेत, त्यासाठी सर्व अटी बाजूला करून कोपरगावचा संपूर्ण भाग वर्ग एक करण्याचा निर्णय करण्याची योजना महसूल मंत्री म्हणून स्वीकारत आहे.

महाराष्ट्र सरकारने कधीच असा निर्णय घेतला नव्हता. हा ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे. तुमचे प्लॉट असतील, त्यावर घर बांधायचं असेल, तर त्यासाठी एनए आणि सनदीची गरज भासणार नाही. कोपरगावात नवीन घर बांधायचं असेल, तर एनए प्लॉटची गरज नाही. कोपरगावच्या सर्व घरांचा नकाशा करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. एका घराचा नकाशा करण्यासाठी चार हजार रुपये खर्च येतो. मी कोपरगावकरांना वचन देतो नकाशा योजनेमध्ये एकाही घराकडून एकही रुपया घेतला जाणार नाही. संपूर्ण घरांचा लँड रेकॉर्ड व सिटी सर्व्हे करून देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची आहे. उतारे वाटपाचा मंत्री मी आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितले आहे.

आता कोपरगावमध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना येणार आहे. सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे. ही सूर्यप्रकाशाची वीज दोन रुपये ८० पैसे दराने तयार होणार आहे. कोपरगावला २०२९ मध्ये दोन रुपये ८० पैसे दराने वीज घरापर्यंत आणली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यघर योजना दिली आहे. या सूर्यघर योजनेअंतर्गत ३० हजार रुपयांमध्ये सूर्यघर बसवता येते. निवडून आल्यावर लाडक्या बहिणींना विनंती आहे की जे शंभर–शंभर युनिट वीज वापरतात, त्यांच्या घरावर सूर्यघर बसवायचं आहे.

६० टक्के लोक फक्त १०० युनिट वीज वापरतात. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत कोपरगावसाठी ५ हजार घरे मंजूर करून देण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. आणि सूर्यघर लागल्यानंतर पुढील १५ वर्षे विजेचं बिल येणार नाही असेही बावनकुळे म्हणाले. यावेळी मंचावर बिपीनदादा कोल्हे, मा. आ.स्नेहलताताई कोल्हे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, युवानेते विवेक कोल्हे आदींसह सर्व उमेदवार, पदाधिकारी, मान्यवर आणि समोर उच्चांकी जनसमुदाय सभेला हजर होता.


