कोपरगावमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांगता सभा संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : रिक्षा वाल्याला हलक्यात कोणीही घेवू नका माझ्यासारखा सर्वसामान्य रिक्षावाला जर राज्याचा मुख्यमंत्री होवू शकतो तर कोपरगावमधील एक सर्वसामान्य राजेंद्र झावरे सारखा सामान्य रिक्षावाला नगराध्यक्ष का होवू शकत नाही. कोपरगावच्या विकासाचा पंचप्राण म्हणजेच धनुष्यबाण असे म्हणत कोपरगाव येथील प्रचाराची सांगता सभा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाजवली.

कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा संपन्न झाली या सभेला आमदार अमोल खताळ, माजी खासदार, सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख नितीन औताडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे, विमल पुंडे, संजीव भोर, शरद खरात, इम्रान पठाण, अक्षय जाधव, कैलास जाधव, बाळासाहेब रहाणे यांच्याससह नगरसेवक पदाचे उमेदवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, शौचालयासह विविध योजनेतील जनतेचे पैसे ज्यांनी हडप केले त्यांना या निवडणुकीत गडप करावे लागेल. माझी सभा होवू नये म्हणून कोणी प्रयत्न केले तरी ते शक्य नाही, या लाडका भावाला कोणीही फसवू शकत नाही. विधानसभेच्या निवडणुकीत मला अनेकांनी खोडा घातला पण लाडक्या बहीणींनी त्यांना चांगला जोडा दिला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. केवळ या योजने बरोबर लाडक्या बहीनींना लखपती बनवून त्यांच्या पायावर उभं करणार आहे.

माझ्यावर अनेक आरोप झाले पण त्यांना आरोपाने नाही तर विकास कामाने उत्तर दिले. शासन मंञालयात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतं राज्यातील जनतेसाठी मी मुख्यमंत्री असताना आडीज वर्षात साडे चारशे कोटी रुपये रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देवून अनेकांचे प्राण वाचवले. आपला अजेंडा विकासाचा आहे. नगराध्यक्ष कार्यकाळात राजेंद्र झावरे यांनी कोपरगावमध्ये खुप विकास कामे केली त्यनंतर २० वर्षे येथे वनवास सुरु होता तो आता या निवडणुकीत झावरेंना विजयी करुन वनवास संपणार आहे.

माझ्या सारखाच झावरेंचा स्वभाव आहे, साधा स्वभाव आहे. कोपरगावला जर दररोज पाणी पाहीजे असेल तर या निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजवले पाहीजे. नगरविकास खाते माझ्याकडे असल्याने ज्या ज्या सुविधा लागतील त्या देण्याचे काम करणार आहे. यापुर्वीही कोपरगावचे पाच नंबर साठवण तलाव, भूमिगत गटारीसह अनेक विकास कामांना मी निधी दिलोय तेव्हा नाकर्त्यांना पाठवू घरी आणु विकास आपल्या विकास दारी. विरोधकांनी कितीही केली काव काव पण भगव्याचेच होणार कोपरगाव असे म्हणत शिंदे सर्वांचे लक्ष वेधत सेनेच्या भगव्याची शेवटच्या दिवशी हवा केली.

यावेळी राजेंद्र झावरे बोलताना म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३० कोटी निधी पाचव्या तळ्यासाठी दिल्यामुळे आज चारदिवसाड पाणी मिळतेय. शहराला दररोज पाणी देणार, विस्थापितांना गाळे बांधून देत शहर स्वच्छ करणार, एकनाथ शिंदे आल्यामुळे आपला विजय निश्चित आहे असे म्हणत शहर विकासाच्या अनेक संकल्पना मांडल्या.

यावेळी जिल्हाप्रमुख नितीन औताडे म्हणाले, या सभेच्या गर्दीमुळे विजय आजच निश्चित झाला आहे. प्रस्तापित नेते असुनही तालुक्यातील शेतकरी उजाड झाला, तरुण बेरोजगार झाला, प्रस्थापित नेते असुनही तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता आम्ही कोपरगावच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत असे म्हणत तालुक्याच्या प्रस्तापितावर निशाणा साधला. या सभेमुळे कोपरगावच्या शिवसेनेला अधिकचे बळ मिळाले आहे.


