कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : आगामी जिल्हाधिकारी यांच्या शहर पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर व नागरिकांच्या तक्रारीवरून कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने आज मुख्य रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यात आली. रस्ते मोकळे करण्यात आले. सोमवारचा आठवडे बाजार, त्यात अतिक्रमणाचा बडगा त्यामुळे बाजारकरुमध्ये काहीशी नाराजी पसरली.

अनेकांनी पालिकेने आम्हाला कुठलीही नोटीस दिली नसल्याचा सूर लावला. मात्र पालिकेच्या अतिक्रमणपथकाच्या वतीने पुढील काळात रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली जाणार असल्याचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी सांगितले.

शहरात आज आठवडे बाजार होता. सकाळी अकरा वाजेपासून स्वामी समर्थ मंदिरापासून पालिकेच्या अतिक्रमणपथक व अधिकारी, कर्मचार्यांनी रहदारीस अडथळा आणणारी, रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमणधारकांवर कारवाई केली. त्यातून व्यावसायिकांची धावपळ उडाली. अनेकांना समजावून सांगण्यात आले.

महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकसमोर थेट बस स्थानकापर्यंत अतिक्रमणे काढण्यात आली. व्यावसायिकांना पालिकेच्या अधिकारी व पथकाने सामंजस्यपणे आपापली ठेले, हातगाड्या ,रस्त्यावर किंवा कडेला थाटलेली दुकाने काढून रस्ते मोकळे करावे असे आदेश दिले.

अनेकांनी पालिकेच्या आवाहनास प्रतिसाद दिला. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.पालिकेच्या वतीने अनेक वेळा रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली जातात व पुन्हा ती अतिक्रमणे जोमाने वाढतात हा सातत्याने येणारा अनुभव आहे. येत्या काळात पालिका प्रशासन अतिक्रमणाचा मुद्दा कसा हाताळते याकडे लक्ष आहे. मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी मात्र ऑक्टोबर महिन्यात अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या असल्याचे सांगितले.

प्रशासनाच्या कामाचा भाग म्हणून हि कारवाई करण्यात आली. पुढील काळात रस्त्यावर अडथळे आणणारे अतिक्रमणे करतील त्यांच्यावर पालिकेच्या पथकाच्या वतीने कारवाई करण्यात येईल असे हि जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. व्यावसायिकांनी देखील कमीत कमी जागेत व रहदारीस अडथळा होणार नाही याचा विचार करावा असे आवाहन जगताप यांनी केले आहे.


