कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९/८/२०२६ : विमान पहिल्यांदाच अगदी जवळून पाहण्याचे कुतूहल घेऊन काकडी येथील श्री साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोहोचलेले संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी विमानतळाची कार्यप्रणाली, सुरक्षा व्यवस्था, तांत्रिक यंत्रणा आणि विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेत परतले. मात्र परतीच्या प्रवासात त्यांच्या डोळ्यांत केवळ विमान पाहिल्याचा आनंद नव्हता, तर पायलट होण्याचे स्वप्नही होते. कुतूहलाचे ध्येयात झालेले हे रूपांतर या शैक्षणिक भेटीचे विशेष आकर्षण ठरले.

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा नुकताच २६वा स्थापना दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, सामाजिक जाणीव, व्यवहारज्ञान तसेच विविध क्षेत्रांची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उद्देशाने संस्थेच्या वतीने अनुभवाधारित उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी श्री साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट, शिर्डी येथे शैक्षणिक भेट दिली.

संस्थेचे ट्रस्टी सुमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राचार्य के. एल. दरेकर व कॅम्पस प्रशासक विजय भास्कर यांच्या नेतृत्वाखाली एकूण ९८ विद्यार्थी व स्टाफ या भेटीत सहभागी झाले.

विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विमानतळाची संपूर्ण कार्यप्रणाली समजावून सांगितली. विमानांचे आगमन व प्रस्थान, प्रवाशांची सुरक्षा तपासणी, विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था, विविध तांत्रिक यंत्रणा व मशिनरी तसेच विविध विभागांमध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे, दिल्लीहून शिर्डीला आलेले विमान प्रत्यक्ष धावपट्टीवर उतरताना पाहण्याचा रोमांचक अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.

विद्यार्थ्यांनी विमानतळ अधिकाऱ्यांशी संवाद साधत विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबतही माहिती घेतली. पायलट, सुरक्षा अधिकारी, तांत्रिक कर्मचारी, विमानतळ प्रशासन यांसह विविध क्षेत्रांतील जबाबदाऱ्या व संधी समजल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी भर पडली.

संजीवनी सैनिकी स्कूलची राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील ओळख लक्षात घेऊन विमानतळावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष आपुलकीने स्वागत केले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली ग्रीटिंग कार्ड्स विमानतळ अधिकाऱ्यांना भेट देत कृतज्ञता व्यक्त केली. विमानतळाचे डायरेक्टर कृष्णा पॉल यांनी विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी विशेष परवानगी दिली. यावेळी सहशिक्षक कटाळे , भांबरे तसेच संस्थेचे कल्चरल कॉर्डिनेटर शुभम जाधव उपस्थित होते.

यावेळी ट्रस्टी सुमित कोल्हे म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून जग समजून घेतले पाहिजे. त्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत. यासाठी संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे व माननीय मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या पाठिंब्याने संजीवनीमध्ये अशा अनुभवाधारित उपक्रमांना विशेष महत्त्व दिले जाते.

विमानतळावरून परतताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि डोळ्यांतील चमक वेगळीच होती. विमान पाहण्याच्या कुतूहलाने सुरू झालेली ही भेट अनेक विद्यार्थ्यांच्या मनात पायलट, विमानतळ अधिकारी आणि तांत्रिक क्षेत्रात कार्य करण्याची स्वप्ने रुजवून गेली. पुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देत विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारी ही भेट संजीवनीच्या सर्वांगीण आणि अनुभवाधारित शिक्षणाच्या संकल्पनेचा प्रत्यय देणारी ठरली.


