कोपरगाव प्रतिनिधी, दि. 30 : आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांची केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने आयोजित केल्या जाणा-या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड झाली. युवराज शिंदे, गौरव चिंचाणे, गुंजन चौधरी आणि प्रियंका पावरा अशी या चार विद्यार्थ्यांची नावे आहेत. येत्या १४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे हि स्पर्धा होणार आहे.

ऊर्जा व विजेची बचत, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गुणवत्तेच्या आधारे या विद्यार्थ्यांची या स्पर्धेसाठी निवड झाली. संस्थेच्या दृष्टीने हि मोठी उपलब्धी समजली जाते. या स्पर्धेच्या पात्रता फेरीत या विद्यार्थ्यांनी रंगांच्या प्रभावी वापरातून आणि सर्जनशील चित्रांच्या माध्यमातून ऊर्जा संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश मांडला. त्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीची दखल घेत पुढील राज्यस्तरीय फेरीसाठी त्यांची निवड करण्यात आली.

सद्गुरू आत्मा मालिक माऊली यांच्या कृपाशीर्वादासह विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, विश्वस्त मंडळातील सदस्य, व्यवस्थापक सुधाकर मलिक, साईनाथ वरपे, आत्मदर्शन बागडे, मीरा पटेल , प्राचार्य माणिक जाधव, मीनाक्षी काकडे, नितीन सोनवणे आदिंनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक ज्ञानेश्वर पर्वत, गोकुळ गायकवाड, निलेश सावंत, स्वप्निल पाटील, संदीप धनवटे व राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

नंदकुमार सुर्यवंशी(अध्यश्र, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्र्स्ट) ः- विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, यासाठी आत्मा मालिक शैक्षणीक संकुलात विशेष पुढाकार घेतला जातो, त्याचे हे फलीत आहे.


