कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : राज्यभरातून आलेल्या बचत गटाच्या महिलांनी गोदाकाठ महोत्सवात विक्रीसाठी ठेवलेल्या घरगुती उत्पादनाच्या खरेदीसाठी कोपरगावकरांनी पहिल्या दिवसापासूनच भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे चार दिवसात जवळपास सव्वा दोन कोटीची उलाढाल झाली असल्याची माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.

त्यांनी सांगितले की, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. महिला स्वयंपूर्ण झाल्यास कुटुंबाचा आर्थिक पाया मजबूत होतो आणि समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होतो. महिलांच्या कौशल्यांना मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वात गोदाकाठ महोत्सवाच्या स्वरुपात बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या कौशल्याला आणि उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणाऱ्या गोदाकाठ महोत्सवात शहरासह ग्रामीण भागातील महिला बचत गट, महिला उद्योजिका, गृहउद्योग करणाऱ्या महिला तसेच स्वयंरोजगारावर आधारित व्यवसाय करणाऱ्या महिलांनी सहभाग नोंदवला व कोपरगावकरांनी देखील चारही दिवस भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे चार दिवसाची आर्थिक उलाढाल जवळपास सव्वा दोन कोटी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

सौ. पुष्पाताई काळे व सौ. चैतालीताई काळे यांनी या उपक्रमासाठी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि नियोजनामुळे महोत्सव यशस्वी ठरत असून दरवर्षी त्याची व्याप्ती वाढत चालली असल्यामुळे सहभागी महिला बचत गट, उद्योजक व विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.महोत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांनी गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन, सजावट, प्रकाशयोजना आणि कार्यक्रमांच्या उत्कृष्ठ आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.

अनेक नागरिकांनी कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी हा महोत्सव एक उत्तम व्यासपीठ ठरत असल्याची भावना व्यक्त केली. मध्यमवर्गीय व ग्रामीण ग्राहकांना दर्जेदार, स्वदेशी आणि परवडणारी उत्पादने मिळाली.महिला उद्योजकांसाठी हा महोत्सव आत्मनिर्भरतेकडे नेणारा मजबूत टप्पा ठरला.या खरेदी प्रक्रियेतून केवळ पैशांची देवाणघेवाण झाली नाही, तर विश्वास, गुणवत्ता आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळाले. त्यामुळे गोदाकाठ महोत्सव खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक आणि परिणामकारक पाऊल असल्याचे सहभागी बचत गटाच्या महिलांनी सांगितले.

बचत गटाच्या महिलांनी घरबसल्या छोटे-मोठे उद्योग सुरु करून उत्पादित केलेल्या तयार मालाला गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून हक्काची शाश्वत बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे गोदाकाठ महोत्सवाचा नावलौकिक राज्यभर पसरला आहे. दरवर्षी गोदाकाठ महोत्सवात गर्दीचे आणि आर्थिक उलाढालीचे विक्रम होत असले तरी बचत गटाच्या महिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच गोदाकाठ महोत्सवाने मिळविलेले खरे यश आहे.

या वर्षी ३५० स्टॉल्स उभारूनही अनेक बचत गटाच्या महिलांना स्टॉल्स मिळाले नाहीत त्यामुळे बहुसंख्य बचत गटाच्या महिलांनी २०२७ च्या गोदाकाठ महोत्सवाचे स्टॉल्स बुकिंग यावर्षीच करून ठेवले यावरून बचत गटाच्या महिलांचा गोदाकाठ महोत्सवावर असलेला दृढ विश्वास सिद्ध होत असल्याचे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या व कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोदाकाठ महोत्सवात समता रक्त पेढी संगमनेरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

घरगुती उत्पादन, खाद्यपदार्थ, हस्तकला, शेतीपूरक वस्तूचे उत्पादनाला नव्हे तर महिलांच्या कष्टांना गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून बाजारपेठ मिळाली. दरवर्षी लाखोंची उलाढाल होत असली तरी या महोत्सवाचे खरे यश उलाढालीच्या आकड्यांमध्ये नाही, तर महिलांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या आत्मविश्वासात आहे. गोदाकाठ महोत्सव म्हणजे महिलांच्या कष्टांना मिळालेला सन्मान, आणि त्यांच्या स्वप्नांना मिळालेले आकाश आहे. बचत गटाच्या महिलांनी कर्तृत्व, कौशल्य आणि स्वाभिमान सिद्ध केला असून ही केवळ बाजारपेठ नाही, तर महिलांच्या आत्मसन्मानाचा उत्सव आहे. महिला सक्षमीकरण, स्वावलंबन व स्थानिक उद्योजकतेला बळ देणारा हा उत्सव पुढील काळातही अधिक प्रभावीपणे असाच सुरु राहील. – आ. आशुतोष काळे


