कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ शहरामध्ये एका तरुणीवर मदरशात नेऊन अतिप्रसंग आणि बळजबरीने धर्मांतर केल्याचे आरोप करत शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मदरशाचा कोणताही संबंध नसून मदरशाशी जोडलेल्या संबंधाबाबत सखोल चौकशी होऊन जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मदरशातील मौलाना, ट्रस्टी आणि मुस्लिम बांधवांनी केली असून या आशयाचे निवेदन शनिवारी संध्याकाळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कालपासुन सोशल मिडीया व वर्तमान पत्रातुन मुलीवर मदरसा मध्ये नेवुन अति प्रसंग केल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. अशी कुठल्याही घटनेशी दुरान्वये मदरसेचा संबंध नाही. अत्याचाराची झालेली घटनेची सखोल चौकशी होवुन दोषींना कठोर शासन करावे, अशी समस्त मुस्लिम समाजाची मागणी आहे.
मदरसा गेल्या ५० वर्षापासुन अनाथ, गरीब मुलांना मोफत धार्मिक शिक्षण देण्याचे काम करीत असुन मदरशामध्ये आजपर्यंत कुठलेही बेकायदेशीर कृत्य घडलेले नाही व मदरसा अशा कुठल्याही गोष्टीचे समर्थन करीत नाही. मदरसामध्ये सामाजिक सलोखा व सौहाद्र वाढविण्याचे काम नेहमीच केले जात आहे. मदरसामध्ये कुठल्याही असामाजिक तत्वांना थारा दिला जात नाही व देत नाही. मदरसा नेहमीच ‘कायद्याच्या चौकटीत राहून आपले सामाजिक व शैक्षणिक कामकाज करीत आहे.
या घटनेमध्ये मदरशाशी जोडलेल्या संबंधाबाबत घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे सदर घटनेची चौकशी कामी मदरसा व त्यामधील शिक्षक व कर्मचारी पोलिस प्रशासनाला संपुर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन देत आहे. मदरसा व्यवस्थापक व संपुर्ण मुस्लिम समाज या झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करीत आहे. इस्लाम धर्मामध्ये बळजबरीने धर्म परिवर्तनाची कोणतीही मान्यता नाही व मदरशामध्ये यापुर्वीच्या गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात अशी कोणतीही बेकायदेशीर घटना घडलेली नाही.
घटनेचे गांर्भीय पाहता काही असामाजिक तत्वे सदर घटनेचा गैरफायदा घेवुन, मदरशा मधील, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर स्टाफ व त्यांचे कुटूंबिय यांचे जिवीतास हानी पोहचविण्याची शक्यता नाकारता येत नाही, या बाबत प्रशासनाने दखल घ्यावी. या घटनेची सखोल चौकशी होवुन गुन्हेगारांवर कठोरात कठोर कायदेशीर कार्यवाही करावी असे नमूद करण्यात आले आहे. यावेळी मदरशातील मौलाना ट्रस्टी तसेच शहरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते.