कोपरगाव बसस्थानकासह मतदारसंघातील खड्ड्यांचेही श्रेय आमदार काळेंनी घ्यावे – अविनाश पाठक

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ जानेवारी २०२३ : माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करवून आणलेल्या निधीतून झालेल्या विकासकामाचे उद्घाटन व लोकार्पण करून फुकटचे श्रेय लाटणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील एस. टी. बसस्थानकाचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी वेळीच लक्ष का दिले नाही? त्यांच्या दुर्लक्षामुळे व निष्क्रियतेमुळे बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर काँक्रिटीकरणातील लोखंडी गज आता उघडे पडले आहेत. आ. काळे यांच्या नाकर्तेपणामुळे बसस्थानकाच्या परिसरातच नव्हे तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, अशी घणाघाती टीका भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी केली आहे.

Mypage

             दिनार कुदळे यांनी केलेल्या टीकेला अविनाश पाठक यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. अविनाश पाठक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव शहरात सुसज्ज व अद्ययावत बसस्थानक असावे, कोपरगाव तालुक्यातील व आसपासच्या भागातील प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात, या हेतूने कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या तत्कालीन प्रथम स्नेहलता कोल्हे यांनी नवीन बसस्थानक इमारतीसाठी त्यांच्या काळात सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला. स्नेहलता कोल्हे यांच्या निधीतून कोपरगाव येथे बसस्थानकाची नवीन सुसज्ज इमारत उभारण्यात आली.

Mypage

त्याचप्रमाणे पोलिस स्टेशन, पंचायत समिती, नगरपालिका, वाचनालय इमारत, बाजार ओटे, गोकुळनगरी पूल अशी असंख्य कामे स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळात मार्गी लागली. दरम्यान, स्नेहलता कोल्हे यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर बसस्थानक परिसरात प्रवेशद्वार व इतर कामे करण्यात आली. मात्र, ही सर्व कामे विद्यमान आमदार काळे यांनी उद्घाटनाच्या फोटोसाठी अत्यंत हातघाईने उरकवण्यास भाग पाडले. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. या बसस्थानकाच्या आत येण्याच्या मार्गावर प्रवेशद्वाराजवळील लोखंडी गज आता बाहेर आले आहेत. त्याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गजाला अडकून दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल अविनाश पाठक यांनी उपस्थित केला आहे.

Mypage

             बसस्थानकामध्ये येण्याचा आणि बाहेर जाण्याचा जो रस्ता आहे, त्या ठिकाणी व बसस्थानकाच्या परिसरात जे काम झालेले आहे ते कुणाच्या हट्टापायी निकृष्ट झालेले आहे हे जनतेला ठाऊक आहे. बसस्थानक परिसरात आणि प्रवेशद्वाराच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. हे काम दर्जेदार व्हावे, याकडे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक होते; परंतु निव्वळ चमकोगिरी करणाऱ्या विद्यमान आमदारांनी मोठा गाजावाजा करत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या बसस्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन उरकून घेतले.

Mypage

स्नेहलता कोल्हे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करवून आणलेल्या निधीतून बसस्थानकाची नवीन सुसज्ज, दर्जेदार इमारत बांधण्यात आली आहे. आ. काळे यांचे या बसस्थानकाच्या कामात कोणतेही योगदान नाही. असे असतानाही नेहमीप्रमाणे त्यांनी न केलेल्या विकासकामाचे उद्घाटन करण्याची हौस भागवून घेतली; पण आ. काळे यांच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या बसस्थानकाचे अंतिम टप्प्यातील काम घाईघाईने उरकण्यात आले. त्यामुळे हे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू होऊन एक वर्ष होत नाही तोच परिणाम दिसू लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *