शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : वक्तृत्व ही जनतेच्या मनावर अधिराज्य करणारी कला असून चमकदार शैलीपेक्षा विचारांची पेरणी करणारे भाषण अधिक सरस ठरत असते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष लांडगे यांनी केले.
येथील महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित न्या.रानडे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य रमेश भारदे होते.
या स्पर्धेत राज्यभरातील पंचवीस स्पर्धकांनी सहभाग घेतला. परीक्षण प्रा. राजेंद्र सलालकर व प्रा.सुसर यांनी केले. स्पर्धकांना मार्गदर्शन करतांना प्रा.सलालकर म्हणाले , वक्तृत्व हा समाज सुधारणेचा पाया असून व्यक्तिच्या मनाची मशागत करत वैचारिक पातळी उंचावण्यासाठी या कलेचा उपयोग व्हायला हवा.
यावेळी प्रथम क्रमांकासह स्पर्धेचा मानाचा न्या.रानडे स्मृती करंडक, सन्मानचिन्ह, प्रमाण पत्र व रोख रुपये ७ हजाराचे पहिले पारितोषिक नगर न्यू आर्टसच्या महेश उशीर याने पटकावले. बीडच्या बलभीम महाविद्यालयाच्या रोहन चव्हाण याने सन्मान चिन्ह व रोख रुपये पाच हजार मिळवून दुसरा क्रमांक तर नगर महाविद्यालयाच्या अनिकेत डमाले याने सन्मान चिन्ह व रोख रुपये तीन हजाराचे तृतिय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. प्रियंका गारपगारे, साक्षी लांडे, कोमल औटी यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली.
यावेळी वाचनालयाचे पदाधिकारी जीवन रसाळ, मधुकर देवणे, प्रल्हाद कुलकर्णी, हरीश भारदे, एजाज काझी, आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ.ओंकार रसाळ यांनी प्रास्ताविक केले तर बाळासाहेब देशपांडे यांनी आभार मानले.