शेवगावात महसूल सप्ताहाचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३१ : राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक वर्षी १ ऑगष्ट महसूल दिन साजरा करण्यात येतो. मात्र यंदा दि .१ ते ७ ऑगष्ट या काळात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन यानिमिताने संपूर्ण आठवडाभर रोज विविध कार्यक्रमाचे व उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शेवगावचे तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.

मंगळवार दि. १ ऑगस्टला महसूल सप्ताहाचा प्रारंभ होणार असून महाराष्ट्र जमिन महसूल आदि कलम १५५ अंतर्गत दाखल झालेले, अर्ज सेतु सुविधा केंद्रामार्फत नोंदवून ई हक्क पोर्टल वर त्याची नोंद घेऊन मंजूरीसाठी प्रांताधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे. तसेच ई – चावडी प्रणालीद्वारे महसूल वसूली प्रारंभ करण्यात येणार आहे.

बुधवारी २ ऑगस्टला युवा संवाद उपक्रमा अंतर्गत नवीन मतदार नोदणी व आधार कार्ड काढणे व त्यांची दुरुस्ती, जात प्रमाणपत्र यासाठी न्यू आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयात युवा संवाद उपक्रम होणार आहे. शहर व तालुक्यातील प्रत्येक विद्यालयात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 3 ऑगस्टला एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत पूर्व मानसून व मान्सून कालावधीतील अतिवृष्टीत व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात, तसेच सर्व मंडळात महसूल अदालत जमिन विषयक वाद मिटविण्याबाबत विशेष शिबीर, तसेच आपले सरकार पोर्टल वर दाखल तक्रारीचे निवारण.

दि. ५ ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम दि. ६ ला महसूल संवर्गातील कार्यरत व सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद दि. ७ ऑगस्टला लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी यांचे उपस्थितीत सांगता होणार असून महसूल सप्ताहात केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे.