मुलामुलीमध्ये भेदाभाव होता कामा नये – न्या. जागुष्टे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३१: महिलांनी आता सर्व क्षेत्रे पादाक्रांती केली आहेत. त्या कोणत्याही क्षेत्रात पुरुषापेक्षा मागे नाहीत. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, संरक्षण, अंतराळ, संशोधन, एवढेच काय पण राजकीय क्षेत्र देखील महिलांना वर्ज्य राहिलेले नाही. महिलांची ही क्षमता ओळखूनच त्यांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मुला- मुली मध्ये भेदभाव होता कामा नये. असे आवाहन शेवगावच्या दिवाणी न्यायाधीश मा. संजना जागुष्टे यांनी केले.

तालुकाविधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने येथील समर्थ ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयामध्ये आयोजित बेटी बचाव बेटी पढाव, कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात न्यायाधीश जागुष्टे बोलत होत्या. यावेळी न्यायाधीश जागुष्टे यांनी, आज शेवगाव  न्यायालयातील तिन्ही न्यायाधीश महिला असल्याचे स्मरण करून देत त्या म्हणाल्या, अनेक क्षेत्रात  महिला आघाडीवर आहेत.

पंतप्रधान स्व . इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी देशाचे नेतृत्व केले आहे, तर विद्यमान राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु या देखील देशाचं नेतृत्व समर्थपणे सांभाळत आहेत. तेव्हा मुला मुलींमध्ये भेदाभेद करू नये मुलगा वंशाचा दिवा असला तर मुलगी पणती आहे. यावेळी अ‍ॅड. ए. आर. लबडे, अ‍ॅड. एन. के. गरड, अ‍ॅड. गणेश ताठे यांनी यासंबंधीच्या कायदे विषयक मार्गदर्शन केले. शेवगाव वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. के. के गलांडे यांनी प्रास्ताविक केले. विद्यालयाचे प्राचार्य महेश जगदाळे यांनी सर्वांचे स्वागत केले तर सचिन गायके यांनी आभार मानले.