कोपरगाव तालुक्याचे नाव उंचावणाऱ्या गौरीचा सर्वांना अभिमान – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील जगदंबा माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी गौरी पगारे हिने ‘सारेगम लिटिल चॅम्प’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये एकापेक्षा एक सुरेल गीते गाऊन केवळ कोपरगाव तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.

गौरी पगारे ही कोपरगाव तालुक्याची शान असून, ती महाराष्ट्राचे नाव उंचावत पुढे चालली आहे. या गुणी कलावंत लेकीचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे, असे गौरवोदगार माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी काढले. कोल्हे यांनी गौरी पगारे हिला ‘सारेगम लिटिल चॅम्प’ शोमध्ये विजेतेपद मिळावे, अशी जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करून तिला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

ब्राह्मणगाव येथील जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचलित माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी, बालगायिका गौरी पगारे हिची झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगम लिटिल चॅम्प’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये निवड झाली असून, तिची आता अंतिम फेरीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्याबद्दल मंगळवारी ब्राह्मणगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरी पगारे, तिची आई अलका पगारे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीनंतर जगदंबा माध्यमिक विद्यालयात स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते गौरी पगारे हिचा जाहीर सत्कार करण्यात आला. स्नेहलता कोल्हे यांनी गौरी पगारे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. गौरी पगारे हिने ‘सारेगम लिटिल चॅम्प’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये आपल्या सुरेल व बहारदार गायनाने इतर सर्व स्पर्धकांमध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटवत आहे.

गौरी पगारे व तिची आई अलका पगारे या दोघीही ब्राह्मणगाव येथील जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. ही या शाळेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. अलका पगारे यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत मोलमजुरी करून गौरीला शिक्षण देत तिच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन दिले. गौरीसाठी त्यांचा त्याग मोठा आहे. गरीब कुटुंबातील गौरीने अल्प वयात मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.

माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे ब्राह्मणगाव व या गावातील जगदंबा माध्यमिक विद्यालयावर खूप प्रेम होते. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे व आपले या शाळेला नेहमीच सहकार्य राहिलेले आहे. या शाळेच्या प्रगतीसाठी ग्रामस्थांचेदेखील भरीव सहकार्य मिळत आहे. गौरी पगारे हिला सुराची दैवी देणगी व गोड गळा लाभलेला आहे. तिला मिळालेल्या यशामुळे तिच्या आईच्या, शिक्षकांच्या व ग्रामस्थांच्या कष्टाचे सार्थक झाले आहे.

गौरी पगारे हिच्या गायन कलेचे प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर, आनंद शिंदे, गायिका वैशाली माडे आदी दिग्गजांनी विशेष कौतुक केले असून, तिचे भवितव्य उज्ज्वल आहे. गौरी पगारे हिचे ‘सारेगम लिटिल चॅम्प’ शोमध्ये अंतिम फेरीतील स्थान निश्चित होऊन तिला विजेतेपद मिळावे, अशी जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करून कोल्हे कुटुंबीय व संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने त्यांनी गौरीला भरभरून आशीर्वाद दिले. तसेच तिला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

कलाकारांच्या कलेची कदर झाली तरच कलाकारांना प्रोत्साहन मिळते. सर्वांनी कलेचा आदर, सन्मान केला पाहिजे. ‘सारेगम लिटिल चॅम्प’ शोमध्ये गौरी पगारे हिचा प्रथम क्रमांक यावा म्हणून आपण सर्व रसिकांनी आपले बहुमूल्य मत देऊन तिला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन कोल्हे यांनी केले. 

यावेळी कोपरगाव येथील ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा व गायिका सुधा ठोळे, रजनी गुजराथी, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक निवृत्ती बनकर, अशोक येवले, अनुराग येवले, सरपंच बनकर, अण्णाप्पा वाकचौरे, विठ्ठल आसने, भीमराज सोनवणे, जगन आहेर, संजय वाकचौरे, भागवत वाकचौरे, रामदास आसने, बाळासाहेब आहेर, बाळासाहेब गंगावणे,

अरुण महाजन, किशोर आहेर, शरद आहेर, राजेंद्र भोंगळे, पोलिस पाटील रवींद्र बनकर, मुख्याध्यापक वारुळे, शिक्षक आसने, आहेर, सोनावणे, राजपूत, धाकतोडे, संतोष तांदळे, शेळके, माळी, ए. व्ही. आहेर, श्रीमती खुरसने, शिंदे, जेजूरकर, बनकर, तोरणे, गाजरे, अनुसे, बाळासाहेब माळी आदींसह संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.