कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरु होता. या बिबट्याने अनेकांना दर्शन दिले असून बिबट्याच्या हल्यात नागरिक देखील जखमी देखील झाले आहेत. त्या जखमी नागरिकांना शासनाकडून जास्तीत मदत मिळवून देणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
भक्षाच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्याने ग्रामीण भागातून आपला मोर्चा शहरातील नागरी वस्तीकडे फिरविल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. कोपरगाव शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून फिरणाऱ्या बिबट्याने नागरिकांवर हल्ला करून जखमी केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. रहदारीच्या व वहिवाटीच्या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढल्याने नागरीक घराबाहेर पडण्यासाठी घाबरत होते.
त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी स्वत: शासकीय अधिकाऱ्यांसमवेत कोपरगाव शहरातील ज्या भागात बिबट्या निदर्शनास आला त्या भागाची पाहणी केली. आमदार काळे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात पिंजरा लावण्याच्या सूचना केल्या होत्या व बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग व प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत होते. त्या प्रयत्नांना यश आले असून बिबट्याला जेरबंद करण्यात आला आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार संदीपकुमार भोसले, वन अधिकारी प्रतिभा पाटील, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दहे आदी उपस्थित होते.