भावी निमगाव जगदंबा राज्यातील भक्तांचे श्रध्दास्थान

शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ : तालुक्यातील भावी निमगाव येथे प्राचीन जगदंबा देवस्थान आहे. नवनाथाच्या काळात प्रसिद्ध असलेले भावानगरच पुढे भावी निमगाव म्हणून लौकिक आहे. भावी निमगाव जगदंबा राज्यातील अनेकांचे श्रध्दास्थान आहे. येथील मंदिराचे अहिल्याबाई होळकर यांनी येथील प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करुन देवीच्या चरणी चांदीचा कमरपट्टा अर्पण केला आहे.

देवी मंदिरासमोर सिंहाची पितळी मोठी मुर्ती आहे. मंदिरावर भव्य कळस असून कळसा भोवती देव देवतांचे तसेच पशु पक्षांचे विविध आकृतीचे नक्षीकाम आहे. काही देवीच्या मूर्ती ही कोरलेल्या असून कळसा भोवती नागाचा वेढा व आकर्षक नागफणा आहे. यावेळी शारदीय नवरात्रोत्सवाची पर्वणी साधून ग्रामस्थ विश्वस्थांनी या देवस्थानच्या गादीवर ह.भ.प. अशोक बोरुडे महाराज यांना बसविल्याने पंचक्रोशीतील भाविकांचा उत्साह दुणावला आहे.

मंदिराचा बाज हा हेमाडपंती स्वरूपाचा असून येथील देवीचा तांदळा अतिशय भव्य अनुभूती देणारा आहे. सध्या शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त या परिसरातील भाविक खडी नवरात्र धरतात. खडी नवरात्र भावी निमगाव देवस्थानचे वैशिष्टय आहे. या प्रथेत भाविक नवरात्रात हातात काठी घेतात व उपवास धरतात. जामिनीवर झोपत नाहीत, खाली बसत नाही. पायात पादत्राण घालत नाहीत. झोपाळ्याच्या फळीवर ओनवे होऊन मान टाकून रात्री झोप घेतात. स्नानादि सर्व विधी उभ्यानेच पार पाडतात. या प्रथेला खडी नवरात्र धरणे, काठी घेणे असेही म्हणतात.