कापूस उत्पादक शेतकर्‍यांना न्याय द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ : घटस्थापनेपासून तालुक्यात अनेक ठिकाणी खासगी कापूस खरेदी सुरु झाली असून कापसाच्या प्रतवारी नुसार ५००० ते ६००० प्रति किटल इतका कमी भाव देवून कापूस उत्पादक शेतकऱ्याची आर्थिक लुट केली जात आहे. सध्या शासकीय हमी भाव ७ हजार २० रुपये आहे.  शासकीय खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्यात यावे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

यंदा तालुक्यावर पावसाची अवकृपा झाली असून अशा संकटात कापसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. केंद्रसरकारने कापसाला प्रति क्वींटल दिलेला हमीभाव देखील शेतकऱ्यांची चेष्टा करणारा आहे. कापूस वेचणी मजूरीवर होणारा मोठा खर्च व इतर आवश्यक खर्चाची तोंडमिळवणी देखील होणे मुश्कील आहे. ही वस्तू स्थिती असून त्या व्यतिरिक्त शेतकर्‍याचे स्वतःचे व कुटुंबीयाचे झालेल्या श्रमाचे मोल वेगळे आहे. अशा परिस्थितीत दसरा दिवाळी सारखे सण तोंडावर आलेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी कापूस खरेदी केंद्राचा आधार घेणे अनिवार्य ठरते आहे.

या बाबत सहाय्यक निबंधक व बाजार समिती कडून दूर्लक्ष होत असल्याने तालुक्यात सिसि आयचे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करून कापूस उत्पादक शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिले असून या बाबत शेतकरी हिताचा निर्णय झाला नाही. तर प्रसगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, तालुकाध्यक्ष मेजर भोसले, संतोष गायकवाड, संदिप मोटकर, बाळासाहेब फटांगरे आदिच्या सहया आहेत.