श्रीराम कथेतील प्रेरणेतून जीवन जगण्याचा प्रयत्न करा – ढोक महाराज

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : श्रीराम कथेतील प्रत्येक व्यतिमत्वाच्या जीवन चरित्रापासून आपणास प्रेरणाच मिळते. या प्रेरणेतून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपले जीवन सार्थकी लागणार आहे. श्रीराम कथा जीवाचे कल्याण करणारी, मनःशांती प्राप्त करून देणारी अति सुरस कथा असून जिज्ञासा वृतीने कथा श्रवण केली. तर त्यातून ज्ञान भक्ती व आदर्शवत कर्म करण्याचे संस्कार होत असल्याचे प्रतिपादन रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले.

स्व. राजीव राजळे मित्रमंडळ आयोजित श्रीराम कथेच्या दुसऱ्या दिवशी आयोध्या नगरीत कथेचे दुसरे पुष्प गुंफतांना ढोक महाराज बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, मनुष्याच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आदर्श जीवन जगण्याचा तत्वनिष्ठ मार्ग रामकथेतून मिळतो. रामकथेच्या केवळ श्रवणाने मनुष्याच्या मनातील असंख्य विकारांचे दहन होते. मनाला नवी स्फुर्ती व उर्जा मिळते. त्याचा अनुभव मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभुरामचंद्राच्या जीवन चरित्रा पासून प्राप्त होतो.

परमार्थ केवळ देहा करिता नसून मनाच्या चित्ता करता असल्याने मन बुद्धी व चित्त विचलीत होऊ न देता तल्लीन होऊन केवळ रामकथा ऐकण्याची नव्हे तर अणुकरणाची आवश्यकता आहे. तब्बल एक तपानंतर शेवगावकरांना आमदार मोनिका राजळे व शेवगावच्या स्व. राजीव राजळे मित्रमंडळाच्या माध्यमातून व उत्तम नियोजनामुळे रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य वाणीतून श्रीराम कथा श्रवणाची पर्वणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने उच्चांकी गर्दी होत असल्याने उभारण्यात आलेला भव्य मंडप कमी पडत आहे. आयोजकाना बैठक व्यवस्था वाढवावी लागण्याचे संकेत आहेत.