जखमी समाज बांधवाला भेटण्यासाठी मनोज जरांगे कोपरगावच्या रुग्णालयात, तरुणांची तुफान गर्दी

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : येवला येथे ९ ऑक्टोबर रोजी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली होती. या सभेला जरांगे पाटील यांचे येवल्यात आगमन होताच त्यांच्या स्वागत मिरवणुकीत त्यांच्यावर जेसीबीच्या बकेटमधुन पुष्पवृष्टी करण्यात आली होती. माञ, त्याच वेळी एका जेसीबीच्या लोडर (बकटे) मधून पडून काही तरुण गंभीर जखमी झाले.

एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मनोज जरांगे यांना समजताच जखमी झालेल्या गोकुळ कदम या समाज बांधवाला भेटण्यासाठी मंगळवारी राञी उशिरा जरांगे पाटलांनी थेट कोपरगाव येथील रुग्णालय गाठले. कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज रुग्णालयात येवून जखमी गोकुळ कदमची काळजीपूर्वक विचारपूस करुन उपचार करणाऱ्या संबंधी डाॅक्टर बरोबर चर्चा केली. उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची चौकशी करीत योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन देवुन मुंबईच्या दिशेने रवाना झाले. 

दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे यांची जेव्हा येवला शहरात सभा पार पडली. यावेळी मनोज जरांगे यांच्या स्वागत मिरवणुकीत जेसीबीतून फुलांची उधळण करत असताना लोडर पलटी होऊन झालेल्या अपघातात चारजण जखमी झाले होते. त्यापैकी गोकुळ रावसाहेब कदम रा. नेवरगाव ता. येवला जि. नाशिक यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर कोपरगाव येथील एस. जे. एस. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री १० च्या सुमारास जरांगे  यांनी गोकुळ कदम आणि त्यांच्या नातेवाइकांची भेट घेउन त्यांना धीर दिला.

मनोज जरांगे रुग्णालयाच्या बाहेर पडताच तरुणांनी त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या. यावेळी रुग्णाची काळजी घेण्याची विनंती मनोज जरांगे यांनी डॉक्टरांना केली. या प्रसंगी काही तरुणांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वतीने रोख स्वरूपाची मदत जखमीच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केली असल्याचे सांगितले.

तेव्हा जरांगे पाटील म्हणाले की, माणुसकीच्या नात्याने जर या समाज बांधवाला मदत करण्यात येत असेल तर ठीक आहे. मात्र, राजकारण म्हणून जर कोणी मदत करत असेल तर मदत न केलेली बरी समाज बांधव मदतीसाठी सक्षम असल्याचे जरांगे म्हणाले. जरांगे पाटील यांच्या कोपरगाव भेटीने मराठा बांधवांमध्ये मनोज जरांगे यांच्या प्रति अधिक सहानुभूती वाढली आहे.