एस.एस.जी.एम. कॉलेजच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : रयत शिक्षण संस्थेचे एसएसजीएम महाविद्यालय हे एक अतिशय प्रगत आणि वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. येथील परिसर देखण्या इमारतीने नटलेला आहे. दिवसेंदिवस महाविद्यालयाची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होत आहे. महाविद्यालयात अनेक नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कोर्सेस सुरू झाले आहेत. बीए, बी कॉम, बीएससी, बीबीए, बीसीए, एम ए, एम कॉम, एम एस सी, संशोधन केंद्र सुरू आहेत.

दरवर्षी विद्यार्थी संख्येमध्ये वाढ होत आहे. या विद्यार्थ्यांना आवश्यक ती भौतिक यंत्रणा उभी करावी या दूरदृष्टीचा विचार करून महाविद्यालयाने साडेचार कोटी रुपये बजेट असणारी वीस हजार स्क्वेअर फुट ची दोन मजली इमारत अनेक वर्ग खोल्या आणि प्रयोगशाळा या इमारतीत सुरू होणार आहे.

या दोन मजली इमारतीचे भूमिपूजन रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन, भगीरथ शिंदे यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अ‍ॅड. संदीप वर्पे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विवेक कोल्हे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुनील गंगुले उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी अ‍ॅड. भगीरथ शिंदे म्हणाले, कर्मवीरांचा शिक्षण प्रसार हा नुसता साक्षरता प्रसार नाही, तर समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. या इमारतीचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थांना निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे. महाविद्यालयाला या इमारतीची तत्कालीन तातडीची गरज आहे. ही इमारत लवकरच पूर्णत्वास येईल.

या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रमेश सानप, कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुभाष रणधीर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. अरुण देशमुख, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख महाविद्यालय विकास समितीचे प्राध्यापक, प्रतिनिधी कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. रामभाऊ गमे सर्व सहकारी प्राध्यापक विद्यार्थी व कार्यालयीन सेवक उपस्थित होते.