कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना विकसित कोपरगावचे स्वप्न दाखविले असून त्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकतांना कोपरगावकरांना बस स्थानक परिसरात लवकरच व्यापारी संकुल उभारले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली असून या व्यापारी संकुलाच्या १४ कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोपरगावकरांना विकसित कोपरगावचे दाखविलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न, शहर विकास त्याचबरोबर बस स्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारले जावून बेरोजगार युवक व गरजू नागरिकांना व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. यासाठी आ. आशुतोष काळे यांचा निवडून आल्यापासून पाठपुरावा सुरु होता. त्याबाबत २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी मागणी देखील केली होती व तत्पूर्वी तत्कालीन परिवहन मंत्री यांना निवेदन देखील दिले होते.
या सर्व पाठपुराव्याची दखल घेवून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार हे एप्रिल २०२२ मध्ये पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण व विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण प्रसंगी त्यांनी कोपरगाव बस स्थानकाच्या व्यापारी संकुलाला मंजुरी देखील दिली होती.
व्यापारी संकुलाच्या १० कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून उर्वरित इलेक्ट्रिक कामाची स्वतंत्र निविदा देखील लवकरच प्रसिद्ध होणार असून एकूण १४ कोटी निधी या व्यापारी संकुलाला मिळणार आहे.
या व्यापारी संकुलाला लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी आ. आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून परिवहन विभागाकडून या व्यापारी संकुलासाठी १४ कोटी निधी मजूर करण्यात आला होता. निधीची तरतूद होवून कोपरगाव बस स्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारण्याच्या कामाची निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे. व्यापारी संकुलाच्या कामास लवकरच प्रत्यक्षात प्रारंभ होणार असून त्यामुळे कोपरगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
संगमनेर बस स्थानकाच्या सभोवताली उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाच्या धर्तीवर कोपरगाव बस स्थानकाच्या लगत व्यापारी संकुल उभारण्यात येणार असल्यामुळे बेरोजगार युवक व गरजू नागरिकांना व्यवसाय करण्याच्या संधी तर उपलब्ध होणारच आहे. त्याचबरोबर कोपरगाव शहरातील बस स्थानक, श्री क्षेत्र शिर्डी पासून जवळ असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच राज्यातील प्रवाशांची ये-जा असते व्यापारी संकुलामुळे या प्रवाशांना सोयीसुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
कोपरगाव शहराची वाढती लोकसंख्या, बाजारपेठेचा प्रश्न, व्यापारी संकुल उभारल्यानंतर सुटणार आहे व बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल देखील वाढण्यास मदत होणार आहे. आ. आशुतोष काळे यांनी २०१९ च्या निवडणूक जाहीरनाम्यात व्यापारी संकुल उभारण्याच्या दिलेल्या आणखी एका वचनाची पूर्तता यानिमित्ताने होत असून विकसित कोपरगावच्या दिशेने आ. आशुतोष काळे यांची दमदार वाटचाल सुरु असल्याचे दिसून येत आहे.