पंचसूत्री कार्यक्रमामुळे डिजिटल शाळा निर्माण होत आहेत – पाटेकर

शेवगाव प्रतिनिधी, दि.१२ : वित्त आयोगाचा निधी तसेच मिशन आपुलकी अंतर्गत ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांच्या लोकसहभागातून पंचसूत्री कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर डिजिटल स्कूल तयार होत असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची पंचसूत्री कार्यक्रम संकल्पना व मिशन आपुलकी कार्यक्रमांतर्गत ढोरजळगाव जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी गटविकास अधिकारी पाटेकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संकल्प लोणकर हे उपस्थित होते.

यावेळी पाटेकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत उपस्थित राहून अभ्यास व व्यायाम करावा. शिक्षकांनी काळानुरूप नवीन शिक्षण पद्धती अंगीकारली पाहिजे. माजी विद्यार्थी म्हणून मिशन आपुलकी अंतर्गत पंचसूत्री कार्यक्रमांतर्गत डिजिटल शाळा उपक्रमासाठी त्यांनी रोख पाच हजार रु  देणगी मुख्याध्यापकाकडे सुपूर्द केली.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब अकोलकर, केंद्रप्रमुख सुभाष नन्नवरे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब बढे, मुख्याध्यापक गोरक्षनाथ दुसुंगे, विष्णुपंत खोसे, रोहन साबळे, बाळासाहेब खोसे, अतुल लांडे, सिंधु देवकर, प्रमोद देशमुख, गोरक्ष आव्हाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.