रस्ते व पुलांची दुरुस्तीबाबद सार्वजनिक बांधकाम विभागाला आमदार काळेंच्या सूचना

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : कोपरगाव विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश रस्त्यांचे व पुलांचे नुकसान झाले आहे. या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता सुनील वर्पे यांना दिल्या आहेत.

 कोपरगाव मतदार संघातील राज्यमार्ग, इतर जिल्हामार्गांचे आमदार निधी, जिल्हा नियोजन तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनेक रस्त्यांची व पुलांची कामे पूर्ण करण्यात आली. मात्र चालू वर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या सर्व रस्त्यांचे व पुलांचे नुकसान होवून अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. त्याचा मतदार संघातील जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे या सर्व रस्ते व पुलांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

ज्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा कालावधी शिल्लक आहे त्या रस्त्याची सबंधित ठेकेदाराकडून तातडीने दुरुस्ती करून घ्यावी व ज्या रस्त्यांचा दुरुस्ती कालावधी संपला आहे त्या रस्त्यांची आपल्या विभागामार्फत दुरुस्ती करावी. सध्या सर्वच कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले असून रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ दिसून येत असून खराब रस्त्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने रस्ते व पुलांची दुरुस्ती करा.

            तसेच येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील टोल नाका प्रशासनाने टोलनाका अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर देखील पावसामुळे अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले असून या रस्त्याची टोलनाका प्रशासनाने दुरुस्ती करावी. ओव्हर-ले, डिव्हायडर कलर, थर्मप्लास्टचे पट्टे, गतिरोधक, डिव्हायडर क्लिनिंग, व साईड पट्टी आदी कामे लवकरात लवकर पूर्ण करून वाहनचालकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वरील कामे पूर्ण करावी अशा सूचना टोल नाका प्रशासनाला आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.