कालवा सल्लागार समितीच्या बैठकीबाबाद आमदार काळेंची पालकमंत्री भूसेंकडे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११: गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याच्या मिळणाऱ्या आवर्तनावर रब्बी हंगामाचे नियोजन अवलंबून असते. त्यामुळे मिळणाऱ्या आवर्तनातून कोणती पिके घ्यावी यासाठी लाभ धारक शेतकरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीची वाट पाहत असून कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्याची मागणी आ. आशुतोष काळे यांनी बंदरे व खनिकर्ममंत्री तथा नासिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.

चालू वर्षी पावसाने सर्वच विक्रम मोडीत काढल्यामुळे सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जास्तीत जास्त आवर्तने देण्याचा निर्णय होईल अशी सर्व लाभधारक शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत परतीचा पाऊस थांबला. मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून खरीपाची कसर रब्बी हंगामात भरून निघेल या आशेवर लाभधारक शेतकरी बसला आहे.

सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील मशागतीची कामे सुरु असून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाच्या होणाऱ्या निर्णयावर रब्बी पिकांचे कसे नियोजन करायचे यावर सर्व काही आवलंबून आहे. तसेच मिळणाऱ्या आवर्तनातून पाणी घेणाऱ्या पाणी वापर संस्थांना देखील पुढील नियोजन करणे सोयीस्कर होईल त्यामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक घ्यावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी बंदरे व खनिकर्ममंत्री तथा नासिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे केली आहे.