बसस्थानक इमारतीतील भ्रष्टाचाराला जबाबदार कोण? – दिनार कुदळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ जानेवारी २०२३ : कोपरगाव शहरात उभारण्यात आलेल्या बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू होवून एक वर्ष होत नाही तोच या बसस्थानकाचे काम किती निकृष्ठ दर्जाचे झाले आहेत हे स्पष्ट होत असून त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसून येत आहे. या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण? असा सवाल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माजी आमदार कोल्हे यांना विचारला आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिनार कुदळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील जुन्या बस स्थानकाच्या जागेवर नव्याने बांधण्यात कोपरगाव बस स्थानकाच्या इमारतीमुळे बस प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील अशी लाखो प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र या बस स्थानकाच्या परिसरातील बांधकामाचे स्टिल एक वर्षाच्या आत उघडे पडले आहे. यावरून हे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीत जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला आहे.

उभारण्यात आलेल्या बसस्थानक इमारतीच्या उभारणी मध्ये नियोजनाचा अभाव आहे. संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या बसस्थानकाप्रमाणे चोहबाजूने ज्याप्रमाणे व्यापारी संकुल बांधण्यात आल्यामुळे असंख्य बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे कोपरगाव बस स्थानकाच्या लगत असलेल्या मोकळ्या जागेत देखील व्यापारी संकुल बांधली गेली असती तर अनेकांची उदरनिर्वाहाची निश्चितपणे सोय झाली असती.

मात्र हि दूरदृष्टी बसस्थानक उभारतांना विद्यमान लोकप्रतिनिधींनी घेतली नसल्यामुळे अनेक बेरोजगारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. दुसरीकडे मर्जीतल्या ठेकेदाराला बसस्थानक इमारतीचे काम दिल्यामुळे संबंधीत ठेकेदाराकडून कामाच्या दर्जाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे एक वर्षाच्या आत या बांधकामाचे स्टिल उघडे पडले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न लाखो प्रवाशांना पडला असल्याचे दिनार कुदळे यांनी म्हटले आहे.