कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : शासन आपल्या दारी कार्यक्रमाला आलेले सर्वसामान्य नागरीक भर उन्हात अन्न, पाण्याविना उपाशी पोटी परत घरी निघाले. अनेकांना पिण्यासाठी पाणी नाही, जेवण्यासाठी पुरेसं काही मिळालं नाही. काही मिळाले तर काहींना उपाशीच घरी जाण्याची वेळ आली.
कडेकोट पोलीस बंदोबस्त, कुठेही हालचाल करायला संधी नाही. जवळपास एखादं हाॅटेल नाही, पिण्याच्या पाण्याची बाटली विकत घ्यायचे म्हंटल तरी कार्यक्रमाच्या स्थळी कोणतीही सुविधा नसल्याने अनेकांच्या घशाला कोरड पडली होती. लहान मुलं, वृध्द नागरिकांची तगमग बघून अनेकांच्या जीवाची घालमेल होत होती.
शासन आपल्या दारी आणि उपाशी जात आपल्या घरी अशी अवस्था कार्यक्रमला आलेल्यांची झाली. काहींना जेवनाचे पाकीट मिळाले, पण कोरड जेवण असल्याने पाण्याअभावी घास घशात गुंतत होता. ठसक्याने जीव व्याकूळ होत होता. कार्यक्रमाला गावातून येई पर्यंत सर्व सुविधा आहे आहे असे सांगून गावा गावातून शासनाच्या एसटी मधून जे उपलब्ध होतील त्यांना बसमध्ये कोंबून गर्दीचा विक्रम केला.
कार्यक्रम होईपर्यंत काही ठिकाणी पाण्याच्या बाटल्या पोहच झाल्या पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण संपल्यानंतर सेवेसाठी असलेली शासकीय यंञणा मंञ्यांच्या ताफ्याच्या पाठीमागे धावत सुटले. कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांची सोय करण्याऐवजी मंञी महोदयांच्या सेवेत रमले.
शासन आपल्या दारी या आशेने खुद्द नागरिकच शासकीय अधिकारी, मंञ्यांच्या दारात गेले पण तिथे साधं पाणी पिण्यासाठी मिळाले नसल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त करीत कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली तर ज्यांच्या पुढाकाराने बसमध्ये बसवून आणले त्यांची खरडपट्टी नागरीक करीत होते. काही ठिकाणी केवळ पाणी द्या म्हणून आरडाओरडा करताना नागरीक दिसत होते.
कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळ परिसरात शासन आपल्या दारी हा भव्य कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात आला. एका छताखाली सर्वसामान्य नागरीकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी संपूर्ण राज्यातील प्रशासन एका बाजुला प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जात असले तरी ज्या कार्यक्रमासाठी कोट्यवधी रूपयांचा चुराडा केला जातोय त्या कार्यक्रमाला नागरीकांना घेवून आले.
प्रत्येक गावा गावात सकाळी सात वाजल्यापासून बस भरुन गोरगरीब उपाशी पोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योजना समजून घेण्यासाठी व त्यांचे भाषण ऐकण्यासाठी गर्दी भरवली.
जिल्ह्यातील खेड्यापाड्यातून पहाटेपासून प्रवास करुन सभा स्थळी आलेल्यांची अपेक्षित व्यवस्था करण्यात ऐवजी केवळ सभा सुरु होईपर्यंत नागरीकांना लावून धरले आणि भर सभेत सांगितले की, आलेल्या सर्वांची त्या त्या बसमध्ये जेवणाची व्यवस्था होईल पण तशी व्यवस्था झाली नाही. अनेकांना उपाशीपोटी आपल्या घरी जाण्याची वेळ आली.