शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ : तालुक्यातील लाडजळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले असून शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित “मिशन आरंभ २०२४” उपक्रमांतर्गत दि.१० मार्च रोजी आयोजित केलेल्या इयत्ता-चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल दि.२० मार्च रोजी जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी. म्हणून स्पर्धात्मक स्वरूपाच्या अभ्यासाची तयारी ग्रामीण भागातील मुलांनी प्राथमिक स्तरापासूनच सुरू करावी या हेतूने हा उपक्रम सुरू केला.
यामध्ये शेवगाव तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा लाडजळगाव येथील श्रीपद्म प्रविण शिंदे ( इयत्ता चौथी ) याने या परीक्षेत ३०० पैकी २५२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून बालमटाकळी केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला. त्याचबरोबर अमृता पाटील, श्रावणी तहकीक, साईराज तहकीक, स्वरा नागरे, शिवराज तहकीक, शिवानी जाधव असे एकूण सात विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले आहेत.
मुलांच्या गुणवत्ता विकासात शाळेचे आदर्श वर्ग शिक्षक प्रविण शिंदे त्याचप्रमाणे सहकारी आदर्श शिक्षिका भारती राजगुरू, संतोषी तनपुरे व मंगल गर्जे यांचे मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभले. शालेय भौतिक विकास त्याचबरोबर विद्यार्थी गुणवत्ता विकास कामी गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, विस्तार अधिकारी डॉ. शंकर आसाराम गाडेकर, केंद्रप्रमुख काळु भांगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.