खासदार सदाशिव लोखंडेच्या प्रचार दौऱ्यात महायुतीचे कार्यकर्ते सक्रीय

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. २४ : महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार दौऱ्यात महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्ते सक्रीय झाले आहे. पहिल्या टप्प्यात सक्रीय नसणारे महायुतीचे कार्यकर्ते प्रचार दौऱ्यात मोठ्या प्रमाणात सक्रीय झाल्याचे पहायला मिळाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्याबरोबरच भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआयसह रासपचे कार्यकर्ते सक्रीय झाल्याचे चित्र अकोले व संगमनेर तालुक्यात झालेल्या प्रचार दौऱ्यात पहायला मिळाले.

महायुतीच्या सर्वच आघाड्या सक्रीय झाल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पहायला मिळाले. भाजपचे प्रमुख पदाधिकारी भाजपच्या विविध आघाड्या प्रचारात सक्रीय करण्यासाठी बैठका घेत आहेत. बुथ प्रमुखापर्यंतचे सर्वच कार्यकर्ते सक्रीय झाले असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी दिली. त्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारात अजूनही विस्कळीतपणा असल्याचे दिसत आहे. 

अकोले तालुक्यातील देवठाण, खिरविरे, कोंभाळणे, पिंपळगाव नाकविंद, शेरणखेल, निंब्रळ, श्रीक्षेत्र म्हाळादेवी, टाहाकारी, लहीत, पिंपळगाव दरी, वनकुटे आदी गावांच्या श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त व यात्रेनिमित्त भेटी दिल्या. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, संजय वाकचौरे, प्रदीप हासे, भरत हासे,  विठ्ठल हासे, महेशराव देशमुख, दत्तात्रय रणन्नवरे, शिवाजीराव पाटोळे, प्रकाश कराड, विठ्ठल शिंदे आदींसह महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

खासदार लोखंडे विजयाची हॅटट्रिक करतील असा विश्वास गावातील नागरिक व्यक्त करीत आहेत. जगदंबा माता मंदिर, टाहाकारी, श्री. क्षेत्र खेड भैरवनाथ यात्रा, खिरविरे,  श्री.महालक्ष्मी मंदिर, पिंपळगाव-नाकविंदा, जय भवानी माता मंदिर, शेरणखेल, अंबिका माता मंदिर, निब्रळ, खंडेश्वर देवस्थान, म्हाळादेवी, आदी ठिकाणी खासदार लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. 

शिर्डी मतदारसंघात खासदार झाल्यानंतर विविध शाळेत संगणक संच वाटप करण्यात आले. सभामंडप, सौरपथदिवे, रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल परिसरातून खास कौतुक होत आहे. आपण कामे करण्यात आघाडीवर असल्याने समोरच्या उमेदवार कुणीही असले तरी मतदार मला पुन्हा दिल्लीत पाठवतील. केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा विश्वास खासदार लोखंडे यांनी व्यक्त केला. तुम्ही मला खासदार केल्यामुळे निळवंडे धरणातील पाणीप्रश्न आपण सर्वांनीच मदत करून सोडवू जनतेचाच खासदार म्हणूण भरभरून आशीर्वाद दिलेत. पुढील काळात आपली अशीच साथ मिळेल असा मला विश्वास लोखंडे यांनी व्यक्त केला.

मालपाणी हेल्थ क्लब याठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. या बैठकीला डॉ. खताळ, कैलास हासे,  सदाशिवराजे थोरात,  प्रा.परदेशी सर, राजाभाऊ गुंजाळ आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कमी दिवसात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे आव्हान असल्याचेही यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी सांगितले.

पुण्याहून नाशिकला जाणारा रेल्वेमार्ग संगमनेर येथून शिर्डीलाही टी मार्ग पद्धतीने जोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार लोखंडे यांनी दिली. पुणे- नाशिक रेल्वे मार्गाबाबत मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या जात आहे. हा रेल्वेमार्ग जैसे थे ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.