शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : महाराष्ट्र अग्निशमन संचालनायलयाने शेवगाव नगरपरिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी तांत्रिक मंजुरी दिली असून सदर वाहन खरेदीसाठी नगर विकास खात्याकडून लवकरच निधी प्राप्त होईल अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष आशुतोष डहाळे यांनी दिली आहे.
शेवगाव या ६० हजार लोकवस्तीच्या तालुक्याचे, नगरपरिषद असलेले शहर. हा परिसर अनेक जिनिंग प्रेसिंग तेल गिरण्यानी औद्योगिकदृष्टया पुढारलेला असूनही शेवगाव नगर परिषदकडे अत्याधुनिक अग्नीशमन वाहन असणे अत्यंत गरजेचे होते. येथे चुकून एखादी दुर्घटना घडली, आग लागली तर ३०- ४० किलोमीटर अंतरावरील पाथर्डी, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन वाहन बोलवावी लागते.
म्हणूनच विविध कारणांमुळे लागणाऱ्या आगीवर शास्त्रशुद्ध नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडे अत्याधुनिक वाहन असावे यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून अग्निशमन वाहन मिळावे यासाठी पाठपुरावा सुरु होता. या संदर्भात तांत्रिक मंजुरी मिळाल्याने काही महिन्यात अग्निशमन वाहन दाखल होईल अशी माहिती डहाळे यांनी यावेळी दिली आहे.