नाशिक धरणाच्या पाणलोट क्षेञात जोरदार पाऊस,  गोदावरी वाहते दुथडी

 कोपरगाव प्रतिनिधी दि. ५ :  गोदावरी नदी दुथडी भरून वाहु लागली की, नगर नाशिकच्या नगरीकांची चिंता वाढू लागते तर मराठवाड्यातील नागरीकांना आनंदाच्या उकळ्या फुटतात अशीच अवस्था सध्यातरी झाली आहे. 

 नाशिकच्या धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसाने कहर केला असुन या भागातील धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक कमालीची वाढली आहे. दारणा व गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपाञात सोडल्याने गोदावरी नदी दुथडी भरुन वाहु लागली आहे. पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपाञात ५४ हजार २३३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील विसर्ग दोन दिवस वाढवण्यात आला होता.

आज पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने दारणा व गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग काहीसा कमी करण्यात आला असला तरीही नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातून ५४ हजार २३३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कायम असल्याने मराठवाड्याची तहान भागवणारा नाथसागर अर्थात जायकवाडी धरण सध्या ४० टक्के भरले आहे. जो पर्यंत जायकवाडी ७० टक्के भरते नाही तो पर्यंत नगर नाशिकसह मराठवाड्यातील नागरीकांची धाकधूक सुरुच राहणार आहे.

 सध्या दारणा धरण – ८४.२६ टक्के भरले असुन तेथुन १ जून ते ५ ऑगस्ट पर्यंत ८१ हजार ९२२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आत्तापर्यंत १ लाख २१ हजार ११० क्युसेक्स पाणी गोदावरी नदी पाञातून जायकवाडीला सोडण्यात आले आहे. सध्या नाशिकच्या सर्व  धरणामध्ये  सरासरी ७१.७६ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावर असलेल्या धरणापैकी वालदेवी, भाम, भावली, हरणबारी व केळझर  हि धरणं शंभर टक्के  भरली आहेत .

 इतर धरणापैकी दारणा- ८४. २६ टक्के, मुकणे – ५२.८४ टक्के, वाकी- ६९. ८६ टक्के, गंगापूर – ५६.८६ टक्के, कश्यपी – ५१.०३ टक्के, कडवा – ८१.५८ टक्के, आळंदी – ७४. ६३ टक्के तर पालघर -६३. ८६ टक्के पाण्याने भरले आहेत. जर येत्या काळात ठ दिवसांत पावसाचा जोर कायम राहीला तर नविन पाण्याची आवक वाढेल. जो पर्यंत जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरणार नाही तो पर्यंत नाशिकच्या धरणातील पाणी कितीही वाढले तरीही पाण्याचा वाद संपणार नाही. नगर नाशिकच्या नागरीकांना जायकवाडी कधी भरते याकडे लक्ष आहे. 

 तर मराठवाड्यातील नागरीक नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडू दे आणि गोदावरीला पुर येवू दे म्हणून साकडं घालत असतील. अर्थात गोदावरीला पुर आला कि नगर नाशिककरांची घालमेल सुरु होते तर मराठवाड्यातील नागरीकांना आनंदाच्या उकळ्या फुटतात अशीच काहीशी परिस्थिती सध्यातरी दिसत आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी नगर नाशिक सह मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी पाण्याचे नियोजन करीत आहेत. सध्या अनेक धरणात पाणीसाठा कमी असला तरीही जायकवाडी धरण भरण्यासाठी पाण्याचा विसर्ग करीत आहेत. सध्या जरी गोदावरी दुथडी भरुन वाहत असली तरीही ते पाणी केवळ जायकवाडीच्या लाभधारकांसाठी लाभदायक असणार आहे.