कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : माजी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी येसगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व मतदान केंद्रावर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष अभियान राबवले, मतदान हा लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असून तो प्रत्येकाने बजावला पाहिजे, असे सांगून स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, राज्यात महायुतीच्या शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेत गेल्या अडीच वर्षात चांगल्या प्रकारचे काम केले आहे, महिला बचत गटाबरोबरच लाडक्या बहिणीं तसेच तळागाळातील सर्व घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना आणून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली त्यामुळे कोपरगाव सह राज्यात पुन्हा महायुतीच सक्षम ठरणार आहे.
केंद्र व राज्य शासनाने साखर कारखानदारी बरोबरच विविध घटकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी महायुतीच्या विजयासाठी सर्वार्थाने प्रयत्न करत प्रशासनात आपण कसे सर्वश्रेष्ठ आहोत हे लोकशाही प्रक्रियेतील तळागाळात पटवून देण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले.
त्यामुळे महायुती व मित्र पक्षांचा विजय निश्चित असल्याचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे म्हणाले, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे, संजीवनी ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुका कोल्हे यांनीही येसगाव येथे मतदानाचा हक्क बजावत सर्वांनी मतदान जरूर करावे असे आवाहन केले.