शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : मंगळवार दि.२६ पासून शेवगावच्या खुंटेफळ रस्त्यावरील दुर्गा जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी तसेच तळणी रस्त्यावरील रिद्धीसिद्धी कोटेक्स जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मध्ये भारतीय कपास निगम लि.(सी.सी.आय.) ची कापूस खरेदी सुरू होत आहे.

सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस सरासरी गुणवत्ता (FAQ) दर्जाचा व ८ ते १२ टक्के पर्यंत आर्दताच्या प्रमाणासह विक्रीस आणावा. तसेच कापूस विक्रीस आणताना सातबारा उतारा, आधार कार्ड, २०२४-२५ चा पीक फेरा, बँक पासबुक इ. कागदपत्रे सोबत आणावेत. असे आवाहन शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ यांनी केले आहे.

शेवगाव तालुक्यात दरवर्षी किमान ४२ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाचा पेरा होत असल्याने शेवगाव कापूस उत्पादनाचे मोठे केंद्र बनले आहे. आता पर्यंत खासगी कापूस खरेदीदार शेतकऱ्या कडून मनमानी, साडेसहा ते जास्तीत जास्त सहा हजार ८oo रुपये क्विंटल भावाने कापूस खरेदी करत असत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, वंचितचे शहराध्यक्ष प्रितम गर्जे यांनी शेवगावी सीसीआय केंद्र सुरु व्हावे म्हणून सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर मंगळवार ( दि..२६) पासून सीसीआयची दोन हमीभाव केंद्रे ‘ येथे सुरु होत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी क्विंटल मागे किमान हजार रुपया पर्यंत अधिक मिळणार आहेत. सीसीआयचा कापसाच्या प्रतवारी नुसार ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपये क्विंटलचा भाव आहे.

