राहाता प्रतिनिधी, दि. १४ : शहरात महामार्गावर अपघातात काही महिन्यांत दोन तरुणांचे बळी गेल्यानंतर रिपाईच्या वतीने व ग्रामस्थांनी महामार्गाच्या कडेला असणारी अतिक्रमण व बेशिस्त वाहतूक या विरोधात निवेदन देऊन यावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देत आवाज उठवला होता त्यानंतर स्थानिक नगरपरिषद व पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.
शनिवार सकाळी मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदने महामार्गा लगतची व चितळीरोडची अतिक्रमणे हटवले. नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण विरोधात केलेल्या कारवाईचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र ही कारवाई तात्पुरती मलमपट्टी न ठरता कायमस्वरूपी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील नगर-मनमाड रोड लगत रस्त्यावर अतिक्रमणित जागेत असलेले दुकाने, हातगाड्या, फेरीवाले तसेच छोटे-मोठे दुकाने हटवले आहेत. रोड लगत असणाऱ्या व्यवसायिकांनी गटारीच्या पुढे केलेले अतिक्रमण सुद्धा अतिक्रमण विरोधी पथकाने काढले. तर काही दुकानदारांनी स्वतःहून आपली दुकाने काढली. गेल्या सहा महिन्यात शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर दोघांना आपला जीव गमवावा लागला तर शुक्रवार रोजी एका बावीस वर्षाच्या तरुणाचा अपघातात त्याच जागी मृत्यू झाला या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला होता.
सातत्याने होणाऱ्या अपघाताची दखल घेत राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी बेशिस्त वाहतुकी विरोधात तर मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी शहरातील अतिक्रमणा विरोधात विशेष मोहीम उघडली आहे छत्रपती शिवाजी चौक, राहाता बस स्टॅन्ड कात नदीवरील पूल या दरम्यान वाहनांची तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असते या महामार्गावर प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, बस स्थानक मोठमोठे हॉस्पिटल, पेट्रोल पंप, मंगल कार्यालय व लॉन्स तसेच राहाता पोलीस स्टेशन पंचायत समिती कार्यालय असे शासकीय कार्यालय महामार्ग लगत असल्यामुळे मोठी वर्दळ या ठिकाणी नेहमी असते त्यामुळे येथे छोटे-मोठे अपघात होत असतात यामध्ये काहींचे बळी गेले तर काहींना आयुष्याची अद्दल घडली आहे.
सामाजिक जाणीव ठेवून रहदारीच्या सार्वजनिक ठिकाणी वाहतूक नियमांचे पालन होणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही अशी नागरिकात चर्चा आहे. बेशिस्त वाहतूक, बेशिस्त दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पार्किंग संदर्भात शहरात मोठी समस्या आहे त्यामुळे खरेदीदार अथवा ग्राहक त्या त्या दुकानांसमोर वाहने लावून रहदारीला अडथळा निर्माण करतात व अनेकदा अपघाताला कारणीभूत ठरतात. नगर मनमाड महामार्ग प्रमाणेच चितळी रोड व गळवंती मार्ग व शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे प्रशासनाने काढणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून केली जात आहे.
महामार्ग लगत होणाऱ्या अतिक्रमामुळे राहाता शहरात अपघातात दोन व्यक्तींचा बळी गेला या या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत नगरपरिषद व पोलीस ठाणे यांना अतिक्रमण काढण्याबाबत निवेदन दिल्यानंतर शनिवारी प्रशासनाने अतिक्रमण काढले. मात्र ही कारवाई तात्पुरती न करता कायमस्वरूपी असावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.