शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : दीर्घकाळापासून थकबाकी असलेल्या तालुक्यातील एकूण ३९ गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या तब्बल ७२ संचालकांकडे सोसायटीची थकबाकी असल्या कारणाने त्यांची पदे रद्द करण्याचे आदेश शेवगाव तालुका सहाय्यक निबंधक विजयसिंह लकवाल यांनी दिले आहेत. यात काही जण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच आजी, माजी सरपंच, पंचायत समितीचे माजी सदस्याचा समावेश असल्याने परिसरात खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सहाय्यक निबंधक विजयसिंह लकवाल यांनी तालुक्यातील ११८ थकीत संचालकांना ६ सप्टेंबर रोजी थकबाकी संदर्भात नोटीसा बजावल्या होत्या. त्यातील ४६ संचालकांनी थकबाकी भरली तर ७२ संचालकांनी थकबाकी भरली नाही. त्या अनुषंगाने सहायक निबंधक लकवाल यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ (ख) (१) या नियमाअंतर्गत कारवाई करत थकबाकी धारक संचालकांची पदे रद्द करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निबंधक लकवाल यांनी दिली.
या कारवाईमुळे अनेक सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमन व तथाकथित पुढाऱ्यांची पदे रद्द झाली असल्याचे तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे. तालुक्यातील ढोरसडे सोसायटीचे सर्वाधिक पाच सदस्यांची पदे रद्द करण्यात आली आहेत.