ख्रिसमस निमित्ताने शिर्डीत साईभक्तांची मांदियाळी

शिर्डी प्रतिनिधी, दि. २५ : नाताळ सणानिमित्त त्याचबरोबर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शिर्डीत लाखोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावायला सुरुवात केली आहे. ख्रिसमस निमित्ताने शिर्डीत साईभक्तांची मांदियाळी बघायला मिळाली असून साईसमाधीच्या दर्शनानंतर भाविकांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान ख्रिसमस सणानिमित्त सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंगळवार सायंकाळ पासूनच शिर्डीत लाखो भाविकांनी एकच गर्दी केली.संस्थानाची निवासस्थाने हाऊस फुल्ल झाली असल्याचे सांगण्यात आले. तर शहरातील खाजगी हॉटेल फुल्ल झाले आहे. साईभक्तांचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी साईसंस्थान प्रशासनाच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आले आहे. नविन दर्शन रांगेत भाविकांना मोफत चहा पाण्याची व्यवस्था याबरोबरच अत्यावश्यक सेवा तत्पर ठेवण्यात आल्या असल्याची माहिती साईसंस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशविदेशातून लाखों साईभक्त नाताळच्या सुट्टीत बाबांना साकडे घालण्यासाठी शिर्डी साईदरबारी हजेरी लावत असतात.नाताळ आणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईमंदीरावर तसेच साईमंदीर परिसरात रोषणाईने करण्यात येते. यावेळी साईमंदीर प्रवेशद्वार क्रमांक चार समोर शिर्डी नगरपरिषदेच्या गार्डनमध्ये साईबाबांची मुर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. तर हजारो भाविकांना या ठिकाणी मोबाईलमध्ये सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

काल दिवसभरात साईंबाबा संस्थानच्या प्रसादालयात पन्नास ते साठ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला तर साधारणपणे पाऊण लाख भाविकांनी साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले असून या कालावधीत साधारणपणे तीन लाखाहून अधिक भाविक शिर्डीत हजेरी लावतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने शिर्डी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहेत. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने साईसंस्थानच्या वतीने मंदिरात तसेच परिसरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आली आहे.

भाविकांचा ओघ बघता शहरात वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी जड वाहतूक बाह्य वळण मार्गाने वळविण्यात आली आहे. तरीही शहरातील नगर-मनमाड महामार्गावर सकाळी वाहतुकीची कोंडी पहावयास मिळाली. शहरातील मुख्य मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याने शहरातील कोणत्या मार्गाने बाहेर निघावे असा प्रश्न भाविकाना पडला होता. यावेळी नगर-मनमाड महामार्गावर मुख्य चौकात वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना परिश्रम घ्यावे लागले.