कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : जगात चमत्कार आपोआप घडत नाही तर त्यामागे भौतिक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया किंवा हातचलाखी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डोळस श्रद्धा ठेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा यांनी केले. संवत्सर येथील जनता विद्यालयमधील तालुका विज्ञान व गणित प्रदर्शनात त्यांनी चमत्काराचे सादरीकरण केले. त्यामागील कार्यकारणभाव स्पष्ट केला. भुत, भानामती, करणी, जादुटोणा यातील फोलपणा त्यांना स्पष्ट केला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन अनोख्या पद्धतीने पाण्याने दीपप्रज्वलन करून झाले. काही भोंदुबाबा चमत्कार करून भक्तांना कसे फसवतात त्याचे प्रयोग दाखविण्यात आले. नारळातुन करणी काढणे, कलशातुन अखंड तिर्थ काढणे, अंगात येणे, त्रिशुल जिभेतुन आरपार बाहेर काढणे, लिंबातुन भानामती काढणे, रिकाम्या हातातुन अंगारा काढणे आदी चमत्कार करून दाखवण्यात आले. त्याची उकल पण करण्यात आली. यावेळी कोपरगाव गट शिक्षण आधिकारी शबाना शेख , योगेश सावळा, मुख्याध्यापक रमेश मोरे आदी उपस्थित होते.

