कोणतीही पावती न करता खाटीक जनावरांची खरेदी करतात?
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव शहरातील संजयनगर, आयशा काॅलनी, हाजी मंगल कार्यालय परिसर या भागात वारंवार गोवंश जनावरांची बेसुमार कत्तल करुन मांस विक्री होते हे अनेकवेळा उघड झाले. वारंवार एकाच ठिकाणी ठराविक खाटीक कसे काय हे गुन्हे पुन्हा पुन्हा करतात यावर लोकसंवादने लक्ष वेधत माहीती घेतली असता गुप्त माहीतीच्या आधारे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. गोवंश जनावरांची विक्री- खरेदी पासुन खाटकांच्या दावणी पर्यंत गोवंश जनावरांची कत्तल कशी केली जाते यात कोणा कोणाचे हात रक्ताळतात हे लक्षात येते.
शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गोवंश जनावरांचे पालन करतात. गायींना आई समान मानत चारा पाणी करतात नागरीक गायीच्या पोटात तेहत्तीस कोटी देवांचा वास असल्याच्या श्रध्देने पुजा करतात. पण त्याच गोमातेच्या पोटी एखादा गोरा जन्मला किंवा तीच गाय दूध देण्याचे बंद झाली तर त्यांना कोणीही सांभाळण्यास धजावत नाहीत. चारापाणी करण्यापेक्षा विक्रीला घेवून जातात. खाट्या गायी व गोरे हे सर्रास खाटीक घेतात.
कायद्याने गोवंश जनावरांची कत्तल करणे गुन्हा असला तरी गोवंश जनावरांची कसायाला विकणे हाही गुन्हाच आहे. आपल्या गोमातेला बाजारात नेवून कसायाला विकण्याचे काम आपणच करतोय का? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारात जनावरांची खरेदी विक्री दर आठवड्याला सुरु असते. कोपरगाव येथील बाजार समितीच्या बाजारात परराज्यातील व्यापारी येवून जनावरांची खरेदी विक्री करतात.
आजूबाजुच्या जिल्ह्यातील व्यापारी, शेतकरी जनावरे खरेदी विक्रीसाठी गर्दी करतात. हजारो जनावरांची आवक होते, पण कागदोपञी त्याची नोंद दिसत नाही. खरेदी झालेल्या जनावरांची रितसर पावती होत नाही. काही खाटीक लोक गोवंश जनावरांना खरेदी करतात पण पावती सुध्दा करीत नाही. शेतकऱ्यांबरोबर अर्थीक व्यवहार बाजारात करतात आणि बाहेर विक्री झाली नाही म्हणून परत घरी घेवून चाललोय असे म्हणत तिथून शेतकऱ्यांच्या नावाने बाहेर घेवून कत्तलीच्या दावणीला बांधतात.
काही खाटीक जुजबी पावती करतात. छोटेछोटे गोवंशीय गोरे व कालवडी बाजार समितीच्या कर्मचाऱ्या देखत दावे लावून ओढत घेवून जातात. काही राजकीय वजन असलेले व्यापारी, खाटीक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना हुलकावणी देत खरेदी केलेले जनावरं पावती न फाडता खोटेनाटे सांगून कत्तलीच्या दावणीला जनावरे बांधत असतात.
लोकसंवादच्या प्रतिनिधीने जनावरांच्या बाजाराचा आढावा घेतला असता. अनेक धक्कादायक माहीती उघड होत गेली. सोमवारी २७ जानेवारी २०२५ रोजी कोपरगाव येथील बाजार समितीच्या बाजारात गेले असता. दोन फाटका मधुन जनावरांची आवक जावक सुरु होती. बाजार समितीचे कर्मचारी फाटकावर उभे राहून जनावरांच्या गाड्या तपासत होते. ८० टक्के लोक विक्री झाली नाही म्हणून परत घेवून चाललोय असे सांगुन बाजार समितीला चंदन लावत होते.
काही व्यापारी ओळखीचे असल्याने फक्त इशारावर काम सुरु होते. खरेदी विक्री झालेल्या जनावरांची ठरलेली किंमत न सांगता अतिशय कमी किंमत सांगुन नाममाञ पावती फाडली जाते. बाजार समितीची पावती असेल तर पुढील ठीकाणी गोवंश जनावरांची विल्हेवाट किंवा विक्रीसाठी सोयीचे होते. पावती नसेल तर सर्व काही अडचण होते. बाजार समितीला नियम अटीवर काम करावे लागते. गायींच्या कानाला बिल्ला असेल तर पावती करता येते बिल्ला नसेल तर करता येत नाही.
कत्तलीसाठी बिल्ला असलेली गाय खरेदी केली तर संबंधीत खरेदी करणारा व्यक्ती स्वत:च्या नावे खरेदी न करता इतरांच्या नावे खरेदी करुन बाहेर जावून कानातला बिल्ला तोडून काढतात. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी जर जनावरांच्या बाजारात बारकाईने लक्ष दिले, मनुष्यबळ वाढवले तसेच कोणाच्याही दबावाला बळी न पडता काम केले तर खाटकांनी कत्तलीसाठी खरेदी केलेले जनावरं स्पष्ट दिसतील. गोवंश कत्तलीला पहीला लगाम येथेच लावता येतो. सोमवारी रितसर पावती फाडून ६०० जनावरांची विक्रीसाठी कोपरगावच्या बाजारात आणले. ६०० पैकी केवळ २४० जनावरांची विक्री झाल्याचे पावत्यावरुन दिसते.
जनावरांच्या एकूण खरेदी विक्रीतून ९१ लाख ९२ हजार ८०० रुपयाची उलाढाल झाली. झालेल्या उलाढालीतून बाजार समितीला मार्केट फी, साक्षांक फि, सुपर व्हिजन फी सर्व मिळून सरासरी १ टक्का प्रमाणे ९१ हजार ९२८ रुपयांचा कर वसुल झाला. या पुर्वीच्या संचालक मंडळाच्या काळात इतका होतही नव्हता. पुर्वीतर बेधुंद खरेदी विक्री होतात होती. या आठवडे बाजारात ७० टक्के जनावरांची विक्री झाली नाही तरीही बाजार समितीला ९१ हजारांचा फायदा झाला. जर तीच ७० टक्के खरेदी रितसर झाली असती तर कोटींची उलाढाल होवून लाखोंचा फायदा होवू शकतो.
बाजार समितीच्या बाजारात तसे घडत नाही. बेकायदा कत्तल करणारे खरेदी विक्रीचा कायदाही पायदळी तुडवून गोवंश जनावरांसह इतर जनावरांची खरेदी करतात अशी शक्यता आहे. जर रितसर पावती केली असती तर कत्तलीसाठी गोवंश जनावरे जावूच शकत नाहीत. बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे कींवा नजरा चुकवून गोवंश जनावरांना कत्तलीच्या दावणीला बांधण्याची व्यवस्था होते अशी शंका उपस्थित होते. बाजार समितीत आलेल्या जनावरांची खरेदी विक्री स्पष्ट पावत्यात दिसत नाही.
अपवादात्मक काही खाटीक रितसर पावती करतही असतील तर मग त्या गोवंश जनावरांची कदाचित कत्तल होत नसेल पण सर्रास गोवंश जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री केले जाते त्यासाठी गोवंश जनावरांची खरेदी कुठून कशी होते. याचे उत्तर बाजार समितीच्या प्रमुखांनी तसेच कत्तल करणाऱ्यांनी जनतेला दिले पाहीजे.
गोवंश कत्तलीत बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे गोवंश जनावरांना खाटकाच्या दावणीला जाण्याची वेळ येते. यापुढे बाजार समितीच्या खरेदीविक्रीमध्ये जर सुसुत्रता आणली तर कदाचित गोवंश जनावरांची कत्तल होण्याची शक्यता कमी होवू शकते. गोवंश कत्तलखाने बंद होण्यासाठी पोलीस, नगरपालिका जितकी जबाबदार आहे तितकीच बाजार समितीची जबाबदारी महत्वाची असणार आहे.