अतिक्रमण मोहिमेत बेसहारा टपरी धारकांच्या पूनर्वसनासाठी बेमुदत उपोषण सुरु

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : शेवगावातील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक टपरी धारक व्यवसायिक बेसहारा झाले आहेत. त्यांचे तात्काळ पूनर्वसन करण्यात यावे. या मागणीसाठी शेवगाव शहर संघर्ष समिती, भारतीय कम्पुनिस्ट पक्षाच्या वतीने क्रान्ती चौकात गुरुवार दि. २७ पासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे.

        यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील टपरी धारकांना गेली ६० /७० वर्षाचा इतिहास असून टपरीधारकाचे अतिक्रमण काढल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. या टपऱ्यांवर काम करणारे हजारो युवक बेरोजगार झाले आहेत. तसेच त्यांचे वर विविध बँकांचे घर व  व्यावसायिक कर्ज असल्याने बँकांचे तगादे सुरू आहेत. त्यात  मार्च अखेर असल्याने सर्वच बाजूंनी टपरी धारक अडचणीत सापडला आहे.

त्यामुळे काही आत्मघाती कृत्ये टपरधारकाकडून घडू नयेत, यासाठी त्यांचे त्वरित पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे नमुद करून त्यासाठी आंदोलनकर्त्यांनी नगरपरिषदेस शहरातील विविध ठिकाणी असलेले वीना वापर असलेल्या शासकीय भूखंडाची दोन हेक्टर ४० आरची  यादीच सादर करून ती ताब्यात घेऊन तिथे टपरीधारकाचे पुनर्वसन करण्यात यावे असे सुचविले आहे.

  त्यानुसार  १ )गट क्र. १६१९ / १ पैकी सिनेमागृहासाठी राखीव असलेली ४० आर, २) गट क्र. ७०८ कोरोनेशन हॉल, ३) गट क्र. ११२३ धर्मशाळ इनाम वर्ग सात, ४) गट क्रमांक १६१६ / १ गोडाऊन व वाचनालय ५ )पैठण रस्त्यावरील जुने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ६) गट क्र. १११६ मिरी रस्त्यावरील विश्रामगृह ७ )आठवडे बाजार तळ तसेच ८) गट क्र. ७०७ जिल्हा परिषदच्या मराठी शाळा ९ ) गट क्र. ७०४ पंचायत समिती रस्त्याकडील बाजू वरील अशा ९ जागा एकूण दोन हेक्टर ४० आर क्षेत्रावर पुनर्वसनाचे नियोजन होऊ शकते.

यापैकी जिल्हा परिषद मराठी शाळा गट ७०७ या जागेवर बीओटी तत्वाव  गाळे प्रस्तावित आहेत. तर पंचायत समिती रस्त्या लगतच्या (७o४ ) जागेवरही बीओटी तत्त्वावर गाळे बांधणे शक्य आहे. बाकी सात जागा या शर्तभंग व जागेचा वापर होत नसलेल्या आहेत त्यामुळे त्यावर शासन या  व्यवसायिकांचे पुनर्वसन लगेच करू शकते.           

 यासंबंधीचा निर्णय तातडीने होणे आवश्यक आहे, कारण यातील एका टपरीधारकाने स्वतःचे जीवन नुकतेच संपविले आहे. याबाबत प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये असा  गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. असेही शेवटी नमूद करण्यात आली आहे.

निवेदनावर कॉ. संजय नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, चर्मकार विकास संघाचे गोरख वाघमारे, राहुल वरे, कॉ. बाबूलाल सय्यद, राजेंद्र मांडण, जुगलबाहेती, राजूरकर, तांबोळी, अमजद पठाण, इस्माईल शेख, इरफान पठाण, राजेंद्र मेहेर, मोहसीन शेख, गणेश देशपांडे, राजेंद्र देशपांडे, शिवाजी जाधव, उद्धव गुजर, नितीन भाडाईत आदि शेकडो जणांच्या सह्या आहेत.

दरम्यान माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन हे काम कोणीच रोखू शकत नाही. असे सांगून  सध्या सर्वत्र राबविण्यात येत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थापित झालेल्या छोट्या व्यवसायिकाच्या पुनर्वसनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहरातील शासनाच्या मालकीच्या जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागा आणि निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करू असा असा दिलासा दिला.