कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव येथे ईडीने छापे टाकुन मोठे घबाड शोधल्याची जोरदार चर्चा मंगळवारी दिवसभर तालुक्यात सुरु होती. ईडीला घबाड सापडेल असं कोण आहे? कोपरगावमध्ये कोणाच्या घरी छापा टाकला असेल? इतका श्रीमंत कोण असेल ? कोणाचे मोठे व्यवसाय असतील ? तालुक्यात गर्भश्रीमंत कोण आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत कोपरगावकर चर्चा करीत होते. एकमेकांना फोन लावून अंदाज घेत होते. अखेर एका प्रतिष्ठित घराची चौकशी इडीने केल्याची कुजबुज सुरु झाली.

त्याचं झालं असं नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील केजीएस शुगर अँड इन्फ्रा कार्पोरेशन लिमिटेड या खाजगी कारखान्यावर दोन दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी झाली. केजीएस शुगर साखर कारखान्याशी संबंधित साडे तीनशे कोटींच्या आर्थिक घोटाळ्या संदर्भात ईडीनं मोठी कारवाई केली. ईडीने एकाच वेळी नाशिक, कोपरगाव आणि ठाण्यातील विविध ठिकाणी छापेमारीत जवळपास ५ कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची माहीती पुढे आली.

केजीएस साखर कारखान्याशी संबंधित ३५० कोटींच्या बँक घोटाळ्यात ईडीनं नुकतीच नाशिक, कोपरगाव आणि ठाण्यात छापेमारी केली. या छापेमारीत फॅक्टरी, संचालकांची घरं, कार्यालय व इतर ठिकाणांचा समावेश आहे. या कारवाईत ईडीनं मोठ्या प्रमाणात रोकड, सोनं, महागडी कार आणि बरीचशी कागदपत्र जप्त केल्याची चर्चा आहे. केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड या कारखान्याच्या संचालक मंडळांनी खोटी कागदपत्र तयार करून कॅनरा बँकेकडून ३५० कोटींचं कर्ज घेवून बँकेची फसवणूक केल्याचा ईडीला संशय आहे.

बँकेकडून कर्ज घेतलेला पैसा घेतलेल्या कामावर खर्च न करता इतर गोष्टींवर खर्च करण्यात आला. त्याचबरोबर बँकेकडून घेतलेलं कर्ज बुडवल्याचा केजीएस शुगर अँड इन्फ्रा या कारखान्यावर आरोप आहे. आरोपींनी खोट्या शेल कंपन्या तयार करत त्यांच्यामार्फत बनावट गुंतवणुक दाखवत संपूर्ण पैसा खर्च झाल्याचं दाखवलं. यात अनेक बांधकाम व्यवसाय आणि विविध कंत्राटदरांचाही समावेश आहे. त्यात कोपरगावच्या एकाचा सामावेश आहे अशी चर्चा आहे.

ईडीने २३ मे रोजी सकाळी एकाचवेळी विविध ठिकाणी राज्यात धाडसत्र सुरू करण्यात आले. या कारवाईत ईडीनं ७०.३९ लाखांची रोकड, अंदाजे १ कोटी ३६ लाखांचे दागिने, आलिशान बीएमडब्ल्यू कार, १० लाखांची डिमॅट खाती, मोबाईल, लॅपटॉप आणि बरीचशी कागदपत्र जप्त केली आहेत. बँकेचं कर्ज बुडवल्याच्या प्रकरणाशी हा सारा ऐवज संबंधित असल्याचा तपासयंत्रणेला संशय आहे.

आरोपींविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप असल्याने जालना पोलिसांनी याप्रकरणी नोंदवलेल्या मूळ एफआयआरवर ईडीनं आपला ईसीआयआर नोंदवला आहे. मूळ प्रकरणात जालना पोलिसांनी यापूर्वीच आपलं आरोपपत्रही संबंधित न्यायालयात सादर केलेलं आहे. यात मुख्य आरोपी म्हणून केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लि. या साखर कारखान्याचे संचालक दिनकर बोडके यांच्यासह इतरांचा सहआरोपी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.

आर्थिक फसवणूक, कट रचणे, बनावट कागदपत्र तयार करणे यासह बीएनएसमधील इतर कलमांतर्गत या आरोपपत्रात आरोपींविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यावरून दिनकर बोडके यांच्याशी निगडीत व संबंधीत कारखान्याला माल पुरवठा करणारे पुरवठादार व ठेकेदार यांची कसुन चौकशी करीत राज्यात विविध ठिकाणी धाडी टाकुण रोकड, दागिणे, गाडीसह विविध क गदपञ ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणात कोपरगावचे नाव खाजगी वृत्तवाहिनीला झळकत होते. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात ईडीच्या छाप्याची जोरदार चर्चा रंगली. पण संबंधीत कारखान्याला साहित्य पुरवठा करणाऱ्या एका प्रतिष्ठित घराची झाडाझडती ईडीने घेवून गेल्याने चर्चा अधीकच सुरु झाली. लवकरच ईडीच्या तपासात संपूर्ण सत्य बाहेर येईल. या आर्थीक घोटाळ्यात कोपरगावचा संबंध आहे की, नाही हे तपासाअंती उघड होईल.
