कोपरगांव प्रतिनिधी, २२ : प्रत्येकाला रक्ताची सतत गरज लागते, तेंव्हा प्रत्येकांने रक्तदान करून आरोग्य सेवेला हातभार लावावा असे आवाहन अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी केले.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली कार्यस्थळावर शनिवारी उद्योग समुह व संजीवनी ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यांत आले त्याचे उदघाटन करतांना ते बोलत होते.

प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व साखर कामगार पतपेढी कार्यस्थळावर विविध वृक्षांचे कार्यकारी संचालक सुहास यादव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, संजीव पवार, कामगार नेते मनोहर शिंदे व सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख उस विकास-शेतकी विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यांत आले.

कार्यकारी संचालक सुहास यादव याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी कोपरगांवच्या पंचक्रोशीत सहकारी साखर कारखान्याची कामधेनु निर्माण करत विविध संस्थांची उभारणी केली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत साखर उद्योगावर येणा-या अडचणींवर मात करत विविध रासायनिक प्रकल्पांची उभारणी करत शेतक-यांची आर्थीक क्रयशक्ती वाढविली.

परिसराचा विकास साधला अशा नेतृत्वाचा वाढदिवस आपण सर्वजण विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून साजरा करत आहोत हे आपले भाग्य आहे. कारखान्याचे अध्यक्ष व युवानेते विवेक कोल्हे हे बिपीनदादा कोल्हे यांचा वारसा समर्थपणे सांभाळत असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ८९ गावात वृक्षारोपणाची चळवळ हाती घेऊन त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत आहे.

संजीवनी ब्लड बँकेच्या अध्यक्षा निता पाटील यांनी रक्तदानाविषयी समज गैरसमज दुर करत कोपरगांव पंचक्रोशीतील नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी लाखो रूपये खर्च करून अद्यावत रक्तपेढी निर्माण केली आहे. प्रत्येकांने स्वतःसह आपल्या आवडत्या व्यक्तीचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करावा, रक्तदानांने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपत्तीत सापडलेल्या व्यक्तींचा जीव देखील वाचतो. संजीवनी रक्तपेढीशी या कारखान्याचे अतुट नाते आहे.

कार्यकम यशस्वी करण्यांसाठी सचिव तुळशीराम कानवडे, कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज बत्रा, मानव संसाधन अधिकारी विशाल वाजपेयी, कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, भास्करराव बेलोटे, बबनराव चाथे, बाबा कोल्हे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
