कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : राज्य मार्ग क्रमांक ६५ वरील कोपरगाव रेल्वे स्टेशन ते वैजापूर या महामार्गावरील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाशेजारील गारदा नाल्याजवळील स्पीड ब्रेकर परिसरात मोठमोठे खड्डे निर्माण होऊन वाहतुकीला गंभीर अडथळा निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे अनेक छोटे–मोठे अपघात होत असून नागरिकांना जीवघेणा धोका निर्माण झाला आहे. या धोकादायक खड्ड्यांची तातडीने सिमेंट काँक्रीटने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.

कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता, संगमनेर कार्यालयास लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली. त्यांनी सांगितले की, सदर रस्ता हा अत्यंत महत्वाचा असून त्यावरून रोज हजारो वाहनांची रहदारी होते. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे कामगार, दुध उत्पादक शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक यांचा या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वावर असतो. मात्र स्पीड ब्रेकरलगत पडलेल्या खड्ड्यांत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अपघातांचा धोका निर्माण होतो. गेल्या काही दिवसांत येथे अनेक वाहनचालक जखमी झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्पीड ब्रेकरच खाचखळग्यासारखा झाला असून तोही अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणाची तातडीने दुरुस्ती करून रस्ता सुरळीत करावा. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशाराही स्नेहलताताई कोल्हे यांनी दिला आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, हा रस्ता कोपरगाव शहर व परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा असून या मार्गाची दुरुस्ती तातडीने झाली पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाने विलंब न करता या कामासाठी आवश्यक आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
