कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : सावळीविहीर ते अहिल्यानगर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी धूळे-मालेगाव-मनमाड-येवला मार्गे कोपरगाव वरून अहिल्यानगरकडे येणारी वाहतूक पुणतांबा फाट्यावरून जुना मुंबई नागपूर हायवे वैजापूर मार्गे वळविण्यात आली होती. त्याच धर्तीवर कोपरगाव शहरालगत सुरू असलेल्या ७५२ जी या राष्ट्रीय महामार्गाच्या सावळीविहीर कोपरगाव रस्त्यावरील उर्वरित उड्डाण पूलांची व रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी धुळे, मालेगाव, मनमाड येवला मार्गे अहिल्यानगरला येणारी वाहतूक येवल्या मार्गे वैजापूरकडे वळवावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

दिलेल्या पत्रात आ.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, अहिल्यानगर-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी या मार्गावरील धुळे, मालेगाव, मनमाड येवला मार्गे अहिल्यानगरला येणारी अवजड वाहतूक कोपरगाव-पुणतांबा फाटा ते जुना नागपूर हायवेने वैजापूर-गंगापूर मार्गे अहिल्यानगरकडे २१ सप्टेंबर पर्यंत वळविण्याबाबत सांगण्यात आले होते.

परंतु ही मुदत संपल्या नंतर पुन्हा ५ ऑक्टोबर पर्यंत वळविण्यात आलेली वाहतूक जैसे थे ठेवण्याचे आदेश आपल्याकडून देण्यात आले आहे. ही वाहतूक वळविण्यात आल्यामुळे पुणतांबा फाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून प्रवासी, वाहन चालक, विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे व छोटे मोठे अपघात देखील होत आहे.

कोपरगाव शहरातून जाणाऱ्या एन.एच.७५२-जी या राष्ट्रीय महामार्गावर कोपरगाव शहरात साईबाबा कॉर्नर ते पुणतांबा फाटा दरम्यानच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे या महामार्गावर येवला नाका ते पुणतांबा फाट्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून महामार्गाचे कामात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत.

त्यामुळे धुळे, मालेगाव, मनमाड, येवला, कोपरगाव मार्गे अहिल्यानगरला येणारी अवजड वाहतूक येवला- वैजापूर-गंगापूर मार्गे अहिल्यानगरला वळविल्यास साईबाबा कॉर्नर ते पुणतांबा फाटा दरम्यान वाहतूक कोंडी होणार नाही तसेच प्रवासी, वाहन चालक, विद्यार्थी-नागरिकांची देखील गैरसोय होणार नाही. तसेच ७५२ जी या राष्ट्रीय महामार्गाच्या सावळीविहीर कोपरगाव रस्त्याच्या उर्वरित उड्डाण पूलांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी मदत होवून वाहन चालकांच्या अडचणी दूर होऊन प्रवास सुखकर होणार आहे. त्यासाठी धुळे, मालेगाव, मनमाड येवला मार्गे अहिल्यानगरला येणारी वाहतूक येवला मार्गे वैजापूरकडे वळवावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे दिलेल्या पत्रात केली आहे.
