कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या फुटबॉल मैदानावर (दि.०६) ते (दि.०९) दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर जिया शेख, शाळेचे प्राचार्य नूर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या अंतिम सामन्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मीरा-भाईंदर नवघर विभागाचे पोलीस उपायुक्त सोहेल शेख उपस्थित होते. यावेळी त्यांनी खेळाडूंना संबोधित करतांना त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने संस्थेचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे, संस्था विश्वस्त आ.आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम पब्लिक स्कूलचा शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात मोठा नावलौकिक आहे. शाळा विविध खेळांच्या प्रशस्त मैदानांनी व अनुभवी प्रशिक्षकांनी परिपूर्ण आहे त्यामुळे गौतम पब्लिक स्कूल ग्रामीण भागात असूनही मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या सोयी सुविधांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आहे.

दरम्यान स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत गौतम पब्लिक स्कूलच्या मुलांच्या १४ वर्षे वयोगट व १७ वर्षे वयोगट दोन्ही संघाने अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला. स्पर्धेत दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत गौतम पब्लिक स्कूलच्या १७ वर्षाखालील फुटबॉल संघाने उपांत्यपूर्व सामन्यात अकोले संघाचा ५-० असा पराभव केला तर उपांत्य सामन्यात रामराव आदिक पब्लिक स्कूल, श्रीरामपूर संघाचा पेनल्टी शूट आउट मध्ये ४-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेला ज्ञानमाता विद्यालय, संगमनेर संघ हजर राहू न शकल्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी, अहिल्यानगर यांच्या निर्णयानुसार गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर कोपरगाव संघास जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आले. गौतम पब्लिक स्कूलचा सदर संघ विभागीय स्तरावर अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली. १४ वर्षाखालील वयोगटात प्रवरा पब्लिक स्कूल संघ अजिंक्य राहिला.

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे, संस्था विश्वस्त आ.आशुतोष काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे, व्हाईस चेअरमन छबुराव आव्हाड, सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नूर शेख यांनी गौतम पब्लिक स्कूलच्या विजेत्या फुटबॉल संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद व सर्व हाऊस मास्टर्स यांनी मेहनत घेतली.
