कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : कोपरगाव तालुक्यातील सावळीविहीर, पोहेगाव व सोनेवाडी या गावांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून राज्य मार्ग ६५ पोहेगाव-सोनेवाडी-सावळी विहीर रस्त्यासाठी २.२८ कोटी निधी मिळालेला आहे. या पोहेगाव-सोनेवाडी-सावळी विहीर रस्त्याची वर्क ऑर्डर अर्थात कार्यारंभ आदेश ८ ऑक्टोबर २०२४ रोजी देण्यात आला आहे. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम घेतलेल्या ठेकेदार नितीन औताडे यांनी आपल्या राजकीय स्वार्थापोटी जाणीवपूर्वक या रस्त्याचे काम रखडवले असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन काकासाहेब जावळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात काकासाहेब जावळे यांनी पुढे पुढे असे म्हटले आहे की, आ.आशुतोष काळे यांनी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून मतदार संघाच्या विकासकामांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीतून अनेक कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र पोहेगाव-सोनेवाडी-सावळीविहीर रस्त्याची वर्क ऑर्डर होवूनही ठेकेदार नितीन औताडे यांनी जाणीवपूर्वक या रस्त्यांचे काम अद्याप सुरु केलेले नाही त्यामुळे पोहेगाव-सोनेवाडीच्या नागरीकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे.

लोकप्रतिनिधी पोटतिडकीने पाठपुरावा करतात आणि मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळवतात मात्र नितीन औताडे यांच्यासारखे मुजोर ठेकेदार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय स्वार्थासाठी रस्त्याचे काम रखडवून नागरीकांना त्रास देतात हे चुकीचे आहे. अशा ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाचे आधिकारी का पाठीशी घालत आहे? व जाणीवपूर्वक का दुर्लक्ष करीत आहे? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.

नागरीकांना दळणवळणाच्या अडचणी दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी रस्त्यासाठी निधी दिला. निविदा प्रक्रिया पूर्ण होवून रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डरही ठेकेदार नितीन औताडे यांना देण्यात आली आहे. परंतु आर्थिक स्वार्थाबरोबरच स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी नितीन औताडे या ठेकेदाराने रस्त्याचे काम रखडवून पोहेगाव-सोनेवाडी-सावळीविहीरच्या नागरीकांना वेठीस धरीत असून सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाकून गप्प बसल्यामुळे नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दोन दिवसांपूर्वीच आ.आशुतोष काळे यांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी,संबंधित ठेकेदार आणि नागरीकांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत, निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले.अन्यथा येणाऱ्या अधिवेशनात या प्रकरणी लक्षवेधी मांडण्याचा ईशारा दिला आहे.

आ.आशुतोष काळे यांच्या या भूमिकेचे नागरीकांनी स्वागत केले आहे. ज्याप्रमाणे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार असेल तर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी नागरीकांना चांगल्या रस्त्यापासून वंचित ठेवणाऱ्या पोहेगाव-सोनेवाडी-सावळीविहीर रस्त्याचे ठेकेदार असलेल्या नितीन औताडे यांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाने काळ्या यादीत टाकावे अशी मागणी काकासाहेब जावळे यांनी केली आहे.

पोहेगाव-सोनेवाडी-सावळीविहीर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ८ ऑक्टोबर २०२४ ते ८ ऑक्टोबर २०२५ म्हणजेच एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करून दोष दायित्व कालावधी हा २४ महिन्यांचा म्हणजेच रस्ता पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी दोन वर्ष ठेकेदाराची आहे. परंतु अद्याप पर्यंत मुदत संपूनही रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवातच करण्यात आलेली नाही त्यामुळे सरळ सरळ रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अंग काढून घेण्याचा ठेकेदार नितीन औताडे यांचा डाव असल्याचे स्पष्ट होत आहे. – काकासाहेब जावळे.

आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पोहेगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मिळवून भाविकांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी आजपर्यत ७० लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्या निधीतून मंदिर परिसर सुशोभिकरणाबरोबरच अनेक विकासकामे पूर्ण होवून भक्त निवास बांधण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. या श्री मयुरेश्वर मंदिरासाठी अजूनही ५० लाख रुपये निधी मिळावा यासाठी आ.आशुतोष काळे यांनी महायुती शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता परंतु त्यासाठी पोहेगाव ग्रामपंचायतीचे ना हरकत पत्र आवश्यक होते. मात्र त्यावेळी नितीन औताडे यांनी राजकीय द्वेषापोटी पोहेगाव ग्रामपंचायतीचे ना हरकत पत्र दिले नाही. त्यामुळे ज्यांची देवाच्या बाबतीत अशी विचारसरणी असेल तर नागरीकांच्या बाबतीत कशी असेल याची कल्पना येते.- काकासाहेब जावळे.


